‘जानकर माढ्यातून लढणार असतील तर मी त्यांच्या पाठीशी उभा असेन’ 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – माढा लोकसभा मतदारसंघातून मी इच्छुक आहेच, पण जर ही जागा राष्ट्रीय समाज पक्षाकडे गेली आणि त्या पक्षाकडून महादेव जानकर यांना उमेदवारी मिळाली तर यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा राहणार आहे, अस सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले. ते पुण्यात बोलत होते.

माढा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा जानकर यांनी व्यक्त केली आहे. माढा मधून निवडणूक लढवण्याबाबत भूमिका मांडताना जानकर यांनी, “मला हिंदकेसरी व्हायला आवडेल” असे म्हटले होते. बारामतीपेक्षा माढातून लढण्याची त्यांची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती.

त्यामुळे भाजपकडून सुभाष देशमुख यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. माढा मतदारसंघातून जानकर यांना उमेदवारी मिळाली तर त्यांच्या विजयासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते रात्रीचा दिवस करू, असे सांगत देशमुख यांनी सांगितलं. जागा वाटपात माढा ची जागा कोणाकडे जाईल हे नक्की नाही मात्र उमेदवार कोणीही असला तरी मी त्यांच्यासोबत राहीन, असं आश्वासनही त्यांनी दिलं.

दरम्यान, २००९ साली ‘माढा’मधून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात सुभाष देशमुख आणि महादेव जानकर यांनी निवडणूक लढवली होती. यावेळी भाजपची राष्ट्रीय समाज पक्षासोबत युती आहे. त्यामुळे दोघे मिळवून शरद पवारांना नमवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.