भाजपाला पुणे जिल्ह्यातून बारामतीची ‘दशहत’ संपवायचीय !

पुणे/चिंचवड : पोलीसनामा ऑनलाईन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आपले संबंध असल्याचा अपप्रचार करण्यात बारामतीकर तरबेज आहेत. एखादी सभा रद्द झाली की नाहक अपप्रचार केला जातो. या बारामतीकरांची पुणे जिल्ह्यातील दहशत संपवायची आहे, असे राज्याचे सहकार मंत्री आणि पुणे जिल्ह्याचे प्रभारी सुभाष देशमुख यांनी चिंचवड येथे शरद पवारांचे नाव न घेता टीका केली. तसेच घराणेशाही संपल्याशिवाय राज्याची प्रगती होणार नाही. पिंपरी चिंचवड शहरातून राष्ट्रवादी हद्दपार झाली आहे. आता ती जिल्ह्यातूनही घालवा असे आवाहन त्यांनी केले.

पुणे ग्रामीण आणि पिंपरी-चिंचवड शहरातील भाजपाच्या शक्ती केंद्र प्रमुखांची बैठक चिंचवड येथील वाल्हेकरवाडी येथे आयोजीत करण्यात आली होती. त्यावेळी सुभाष देशमुख उपस्थित कार्य़कर्त्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी राज्यमंत्री बाळा भेगडे, प्रदेश सरचिटणीस सुरेश हाळवणकर, भाजपा शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, आमदार बाबुराव पाचर्णे आदी उपस्थीत होते.

बारामतीची जिल्ह्यात दहशत आहे. ती दहशत संपवायची असल्याचे सांगून पुणे ग्रामीणमध्ये भाजपाची ताकद कमी आहे. २१ पैकी केवळ ३ आमदार आहेत. तर जिल्हा परिषदेत ७५ पैकी ७ जिल्हा परिषद सदस्य आहेत. जिल्ह्यामध्ये भाजपा वाढविण्याची आता संधी आहे. त्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत. तसेच जिल्ह्याला राष्ट्रवादी आणि काँग्रेस मुक्त करण्याचे घोषवाक्य करा असे देशमुख म्हणाले.

युती होणार आहे
आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना युती होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत ‘अगली बार २२० पार’ असा नारा दिला आहे. त्यामुळे कोणती जागा कोणाला सुटणार याचा तुम्ही विचार करू नका. ते नेतृत्त्व ठरवणार आहे. जिल्ह्यातील २१ आमदार युतीचेच आले पाहिजेत यासाठी कामाला लागा असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

आरोग्यविषयक वृत्त