हवामान खात्याविरोधात ४२० चा गुन्हा दाखल करा

परभणी : पोलीसनामा ऑनलाईन 

जून, जुलै गेला आता आॅगस्ट उजाडला तरी हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजाप्रमाणे पाऊस पडत नाही. खते, बी, बियाणे आणि औषधी कंपन्यांना फायदा पोहोचविण्यासाठी हवामान खात्याने राज्यासह मराठवाड्यात मोठ्या प्रमााणात पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केल्याचा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विभागीय अध्यक्ष माणिक कदम यांनी केला आहे. त्यांनी हवामान खात्याच्या संचालकांविरोधात ४२० चा गुन्हा दाखल करण्यासाठी परभणीच्या ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये तक्रार अर्ज दिला आहे.

[amazon_link asins=’B07BJZ5JFL’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0309a168-9ab9-11e8-8f42-b5ce707b5b15′]

२०१८ सालच्या पावसाळ्यामध्ये मराठवाड्यासह राज्यभरात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पेरणीची तयारी केली. त्यासाठी खते, बी बियाणे आणि फवारणीची औषधे मोठ्या प्रमाणात विकत घेतली. यातून खासगी कंपन्यांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला असल्याचा आरोप स्वाभिमानी शंतकरी संघटनेकडून करण्यात आला आहे.

हवामान खात्याने मॉन्सूनचा व्यक्त केलेले अंदाज पूर्णपणे चुकला असून त्यांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार जुलैत पाऊस झालाच नाही. आगस्टमध्ये अजूनही पाऊस नाही. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दृष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आधीच कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक खाईत लोटण्याचा प्रकार हवामान खात्याच्या अंदाजामुळे झाला आहे. केवळ बाजारात उलाढाल व्हावी, या हेतूनेच हवामान खात्याने हा अंदाज दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

परभणी ग्रामीण पोलिसांनी हा अर्ज स्वीकारला असून चौकशी करुन योग्य ती कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार शेतकरी आपल्या पीकपाण्याचे नियोजन करतो. परंतु, त्यानुसार पाऊस होत नसल्याने त्याचे नियोजन पूर्णपणे कोलमडते. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांना त्यांना पुरविण्यात येणारा हवामानाचा अंदाज व वेळेवर न मिळणारी माहिती याचीही जबाबदारी आता हवामान खात्याने घेतली पाहिजे, असा विचार आता अनेक ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ व्यक्त करु लागले आहेत.