Lockdown : ‘काय स्टॉक संपला ना ?’ सुबोध भावेचा नेटकर्‍यांना ‘सवाल’

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनाच्या वाढत्या वेगामुळे देशभरात 3 मे पर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटीसुद्धा घरीच बसले आहेत. मात्र सोशल मीडियाद्वारे ते चाहत्यांच्या संपर्कात आहेत. कलाकार घरी बसून चाहत्यांना कोरोनाबद्दल खबरदारी घेण्याचे आवाहन करीत आहेत. अशातच अभिनेता सुबोध भावेने नुकतेच ट्विट करत चाहत्यांना एक प्रश्न विचारला आहे. पण या ट्विटमधील पहिली ओळ वाचून तुमच्या भुवया उंचावतील. ‘काय स्टॉक संपला ना’, असा प्रश्न त्याने चाहत्यांना विचारला आहे. त्यामुळे नेटकरी गोंधळात पडले आहेत.

सुबोधने ट्विट करीत ‘काय स्टॉक संपला ना ? गैरसमज नको. घरी असलेल्या पुस्तकांचा विचारतोय मी. कुठले पुस्तक वाचताय ?’ याचसोबत तो सध्या काय वाचतोय, हेसुद्धा त्याने सांगितलं. ‘मी सध्या अमिशचे रावण, शेषराव मोरे यांचे ‘मुस्लिम मनाचा शोध’ आणि ऋषिकेश गुप्ते यांचा नवीन आलेला संग्रह’, वाचत असल्याचे त्याने सांगितले आहे.

सुबोधच्या या ट्विटला नेटकर्‍यांनी भरघोस प्रतिसाद दिला असून अनेकांनी पुस्तकांचे फोटो पोस्ट करत आपण काय वाचतोय, हे सांगितले आहे. एरव्ही सतत शूटिंगमध्ये व्यस्त असणारे हे कलाकार आता क्वारंटाइनमध्ये आवडीच्या गोष्टी करताना दिसत आहेत. दरम्यान, सुबोध भावेच्या अनोख्या ट्वीटमुळे नेटकर्‍यांमध्ये चांगली चर्चा रंगली होती.