डॉ. काशीनाथ घाणेकरांचे ‘ते’ नाटक पुन्हा रंगमंचावर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आणि डॉ काशीनाथ घाणेकर हा अभिनेता सुबोध भावेचा चित्रपट प्रेक्षकांना विशेष आवडल्याचे दिसून आले. या सिनेमातून घाणेकरांच्या अनेक व्यक्तिरेखा उलगडल्या. त्यांनी केलेल्या नाटक सिनेमातील व्यक्तिरेखा पुन्ह जिवंत झाल्या. सिनेमात दाखवण्यात आलेल्या घाणेकरांच्या नाटकातील सुबोधने साकारलेली लाल्याची भूमिकाही प्रेक्षकांना विशेष आवडल्याचे दिसून आले. अश्रूंची झाली फुले असे या नाटकाचे नाव होते. सिनेमात दाखवलेले हेच नाटक आता पुन्हा खऱ्या रंगमंचावरून रसिकांच्या भेटीला येणार आहे. सुबोध भावे याने याबाबत फेसबुक पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

आपलं नाणं एकदम खणखणीत वाजतंय असा डायलॉग शेअर करतच या नाटकाची जाहिरात करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे या नाटकाचे केवळ 51 प्रयोग होणार आहेत असेही समजत आहे. सुबोध व्यतिरीक्त शैलेश दातार, सीमा देशमुख, उमेश जगताप यांच्याही यात महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. सुबोधने साकारलेल्या लाल्याचा आवाज आता रंगमंचावर घुमणार आहे. प्रतिमा कुलकर्णी या नाटकाचं दिग्दर्शन करत आहेत.

प्रभाकर पणशीकर यांनी हे नाटक 1966 मध्ये पहिल्यांदा रंगमंचावर आणलं होतं. या नाटकाचे एकूण 1111 प्रयोग करण्यात आले होते. यानंतर काही वर्षांपूर्वी रमेश भाटकरांनी यात अभिनय केला आणि पुन्हा हे अजराअमर नाटक रंगमंचावर आलं. रमेश भाटकर यांनी यात लाल्याची भूमिका साकारली होती. तेव्हाही या नाटकाला चांगला प्रतिसाद मिळाला होता.

आणि डॉ काशीनाथ घाणेकर सिनेमानं जुना काळ जिवंत केला असे सांगत या सिनेमाबद्दल बोलताना सुबोध म्हणतो की, “काशीनाथ घाणेकर साकारणं सोपं नव्हतं माझे आणि त्यांचे विचारही पूर्ण वेगळे आहेत. आमची व्यक्तिमत्त्वही पूर्ण वेगळी आहेत. बालगंधर्व, लोकमान्य साकारताना विचारांशी कुठे तरी साम्य होतं. परंतु इथे मात्र असं काहीच नव्हतं. नुसतं त्यांच्या नावावर नाटक हाऊसफुल होत होतं. मला असा अनुभव कधीच आला नाही. अभिजित देशपांडेने सिनेमा चागंला लिहला आहे.” असं म्हणत सुबोध सगळं श्रेय दिग्दर्शक अभिजीत देशपांडेला देतो.

You might also like