सुब्रमण्यम स्वामी चांगलेच भडकले, म्हणाले – ‘आयटी सेलचे प्रमुख मालवीय यांना उद्यापर्यंत पक्षानं हटवावं’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – आपल्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत राहणारे भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पार्टीचे आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांच्याविरूद्ध आघाडी उघडली आहे. बुधवारी सकाळी सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून ट्विट केले की, जर उद्या (गुरुवार) पर्यंत अमित मालवीय यास हटवण्यात आले नाही, तर याचा अर्थ असा होईल की, पार्टीला मला वाचवण्याची इच्छा नाही.

सुब्रमण्यम स्वामी मंगळवारपासूनच अमित मालवीयच्या विरूद्ध लागोपाठ ट्विट करत आहेत. स्वामी यांनी लिहिले की, जर उद्यापर्यंत अमित मालवीयला भाजपा आयटी सेलवरून हटवले गेले नाही, तर याचा अर्थ पार्टी मला डिफेंड करत नाही. जर पार्टीत असा कोणताही फोरम नाही, जेथे मी माझे मत मांडू शकतो, तर मलाच स्वताला डिफेंड करावे लागेल.

यापूर्वी सुद्धा सुब्रमण्यम स्वामी यांनी भाजपा आयटी सेलच्या विरूद्ध लिहिले आहे. त्यांनी लिहिले आहे की, आयटी सेलचे काही सदस्य बनावट आयडी बनवणून माझ्यावर हल्ला करत आहेत. स्वामी यांनी म्हटले की, जर माझे समर्थकसुद्धा असे करू लागले तर त्यास मी जबाबदार नाही, जसे माझ्यावर हल्ला करण्यासाठी भाजपाला जबाबदार ठरवले जाऊ शकत नाही.

त्यांनी आरोप केला की, अमित मालवीय यांच्या अध्यक्षेखाली भाजपा आयटी सेल मला ट्रोल करत आहे. एवढेच नव्हे, स्वामी यांच्याशिवाय दुसर्‍या नेत्यांनी सुद्धा अमित मालवीय याच्यावर आयटी सेलाचा चुकीचा वापर, प्रोपेगंडा पसरवणे आणि सोशल मीडियावर निशाणा साधण्याचा आरोप केला आहे.