75000 रुपयाची लाच घेताना उपनगर अभियंता अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   नगपरिषदेत टेंडर भरताना जमा केलेली अमानत रक्कम लवकर परत मिळवून देण्यासाठी 75 हजार रुपयाची लाच घेताना खोपोली नगरपिषदेतील उपनगर अभियंत्याला अँटी करप्शनच्या पथकाने रंगेहथ पकडले. ही कारवाई गुरुवारी (दि.11) करण्यात आली असून या कारवाईमुळे नगरपरिषदेतील लाचखोर अधिकारी व कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. शशिकांत विठोबा दिघे (वय -45) असे लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या उपनगर अभियंत्याचे नाव आहे.

याप्रकरणी 28 वर्षीय व्यक्तीने नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे बुधवारी (दि. 10) तक्रार केली. तक्रारदार यांनी खोपोली नगरपरिषदेच्या काजुवडी येथील जलशुद्धिकरण प्रकल्पाच्या जागेभोवती वॉल कंपाऊंड बांधले आहे. या बांधकामात कोणत्याही त्रुटी न काढता कामाचे बिल मंजूर करण्यासाठी तसेच नगरपरिषदेकडे टेंटर भरताना जमा केलेली अमानत रक्कम लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी शशिकांत दिघे याने तक्रारदाराकडे 75 हजार रुपयाची लाच मागितली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्यामुळे त्यांनी याची तक्रार नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेची पडताळणी केली असता दिघे याने तक्रारदार यांच्याकडे 75 हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास खोपोली नगरपरिषदेच्या नवीन इमारतीच्या कार्यालयामध्ये सापळा रचला. शशिकांत दिघे याला तक्रारदार यांच्याकडून 75 हजार रुपयाची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक रमेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक शिवराज बेंद्रे, पोलीस हवालदार पवार, ताम्हाणेकर, पांचाळ, चव्हाण, चौगले, माने यांच्या पथकाने केली. सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.