महाराष्ट्रातील 21 वर्षीय युवकानं UPSC परिक्षेत मिळवलं ‘यश’, केली अशी ‘मेहनत’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्रातील जालनासारख्या छोट्याशा गावातून अन्सार अहम शेखने वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्याने पहिल्या प्रयत्नातच हे यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे या काळातच अन्सारचे कुटुंब आर्थिक परिस्थितीला तोंड देत होते, काही वेळा तर अन्सारला दोन वेळेचे जेवण देखील मिळत नव्हते.

यूपीएससी परीक्षेत ३७१ रँक मिळवणाऱ्या अन्सारचे वडील हे एक रिक्षा चालक असून त्यांची दरदिवसाची कमाई केवळ १०० ते १५० रुपये इतकी होती. तर अन्सारची आई शेतमजुरीचे काम करून आपल्या कुटुंबाचा गुजारा करण्यास हातभार लावत असे. अन्सारला दोन बहिणी आणि दोन भाऊ आहेत. आर्थिक परिस्थितीमुळे बिकट असल्यामुळे अन्सारच्या मोठ्या भावास गॅरेजमध्ये मॅकॅनिकचे काम करावे लागते.

अन्सारने एका मुलाखतीत सांगितले की, तो चौथीत असतानाच वडिलांनी शाळा बंद करण्याचे ठरवले होते. परंतु अन्सारच्या टिचरच्या सांगण्यावरून अन्सारचे शिक्षण पुढे चालू राहिले. तसेच अन्सारने सांगितले की, जेव्हा शिक्षण चालू होते तेव्हा एका व्यक्तीने यूपीएससीच्या परीक्षेबाबत सांगितले होते की ही परीक्षा देशातील सर्वात प्रतिष्ठीत परीक्षांपैकी एक आहे. तेव्हापासूनच अन्सारने ठरवले की ही परीक्षा पास व्हायचीच आहे. अन्सारने सांगितले की, परीक्षेच्या तयारीसाठी लागणाऱ्या पैशांसाठी त्याने हॉटेल मध्ये वेटरचे काम देखील केले. तेथे लोकांना पाणी देण्यापासून ते फरशी पुसण्यापर्यंत सगळी कामे केली. आणि अशा रीतीने काम करता करता अन्सारने शिक्षण चालू ठेऊन यूपीएससीची तयारी देखील केली. अखेर त्यांच्या मेहनतीस फळ मिळाले आणि २०१५ ला पूर्ण देशभरातून ३७१ रँक घेऊन अन्सार शेख यांनी यश संपादित केले.