चहा पिल्यावर आता कपही खाता येणार; कोल्हापूरातील 3 इंजिनिअर तरुणांचा अनोखा उपक्रम

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – कोल्हापूर येथील तीन इंजिनिअर तरुणांनी लढवलेली खाण्यायोग्य चहाच्या कप्सची शक्कल कचरा कमी करण्यास याचा नक्कीच उपयोग होणार आहे. दिग्विजय गायकवाड, आदेश कारंडे आणि राजेश खामकर या तीन तरुण इंजिनिअर्सनी खाता येणाऱ्या पर्यावरणपूरक बिस्किट कपची निर्मिती केली आहे. आणि त्या कपचा वापर करण्यास सुरुवात केले आहे. कॅफे, चहाची टपरी, कॉफीची दुकानं या ठिकाणी होणारा कप्सचा कचरा कमी होण्यास नक्कीच मदत होत आहे. तर प्लॅस्टिक, कागदी कप्ससाठी हे बिस्किट कप किंवा एडिबल कटलरी कप्स एक उत्तम पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे.

दरम्यान, जानेवारीपासून त्यांनी इतर दोन मित्रांच्या मदतीने या खाण्यायोग्य कप्सची निर्मिती सुरु करून शहरातील विविध कॅन्टीन, रेस्टॉरंट, कॅफे याठिकाणी त्यांचे कप्स पुरवले जात आहेत. सध्या कप्सबाबतीत सुरू असणारा त्यांचा व्यवसाय वृद्धींगत करण्याचा त्यांचा विचार आहे. कालांतराने बाउल्स आणि प्लेट्स देखील बनवण्याचा या त्रिकुटाचा मानस आहे. इतर काही मित्र आणि काही राजकीय मंडळींची त्यांना यामध्ये मदत केली आहे. खाण्यायोग्य कप्स बनवण्याचे मशिन इतरही कुणाला बनवता यावे याकरताही आराखडा तयार करण्याचे दिग्विजय यांच्या डोक्यात आहे. याबाबत त्यांचा विचार सुरू आहे. तसा त्यांनी आराखडा तयार करून बाजारात आणणार असल्याचे सांगितले.

हैदराबादमधून त्यांनी हे मशिन बनवून घेतले आहे. लॉकडाऊन काळात त्यांनी या कल्पनेला विशेष वेळ दिला. तर दिग्विजय यांच्या डोक्यामध्ये ही सकस कल्पना आली. आणि ती त्यांनी अभ्यासपूर्वक अंमलात देखील आणली. हैदराबाद आणि गुजरातमध्ये मिळणारे त्यांनी खाण्यायोग्य चमचे आणि कप्स मागवले. दीड वर्ष त्याबाबतीत अभ्यास केला आणि कोल्हापूरातही हा उपक्रम करता येईल असा त्यांनी निश्चय केला. सामान्यांना कमी पैशात मिळेल असे कप्स तयार केले आहे.