मुलाखतीला जाण्यासाठी मित्रांनी केली पैशाची मदत, ‘ती’ बनली आदिवासी समाजातील पहिली IAS अधिकारी

वायनाड (केरळ) : वृत्तसंस्था – श्रीधन्या सुरेश केरळच्या संपूर्ण आदिवासी समाजातील पहिल्या महिला आयएएस बनल्या. केरळच्या मागास जिल्ह्यात वायनाडच्या 22 वर्षीय श्रीधन्या सुरेशने यूपीएससी 2018 च्या परीक्षेच्या निकालात 410 वा क्रमांक मिळवला आहे. तिच्या या प्रवासाविषयी जाणून घ्या –

आयएएस बनण्याच्या प्रवासाविषयी माहिती देताना श्रीधन्या सुरेश म्हणाल्या की, माझ्या राज्यातील आदिवासी समाजातील कोणीही नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झालेले नव्हते. आदिवासींमधून ही परीक्षा उत्तीर्ण होणारी मी पहिली मुलगी आहे. येथे फारच थोड्या लोकांना यूपीएससी बद्दल माहिती आहे. पण मला खात्री आहे की, माझ्या या कर्तृत्वाने प्रेरित होऊन आता येथील तरुण नागरी सेवांसाठी तयारी करतील आणि यशस्वीही होतील.

मी केरळचा सर्वात मागासलेला जिल्हा वायनाड येथील रहिवाशी असून मी कुरीचिया जमातीची आहे. माझे वडीलमजूर आहेत तसेच ते गावच्या बाजारात धनुष्यबाण विकण्याचे काम करतात, तर आई मनरेगा अंतर्गत काम करते. मूलभूत सुविधांच्या अभावी मी आणि माझी तीन भावंडे वाढलो. आमच्या समाजात मुले व मुलींमध्ये फारसा भेदभाव करत नाहीत. माझे कुटुंब खूप गरीब होते, परंतु पालकांनी त्यांची गरीबी माझ्या शिक्षणाच्या मार्गावर येऊ दिली नाही. वायनाडमध्ये माझे प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर मी कालीकटयुनिव्हर्सिटी मधून अप्लाइड झूलॉजी मधून मास्टर्स केले.

शिक्षण संपल्यानंतर मी केरळमधील अनुसूचित जमाती विकास विभागात लिपिक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. काही काळ वायनाडमधील आदिवासी वसतिगृहांची वॉर्डन म्हणून देखील काम केले. एकदा माझी भेट आय.ए.एस. अधिकारी श्रीराम सांबा शिवराव यांच्यासोबत झाली. त्यामुळे माझ्यामध्ये आयएएस अधिकारी बनण्याची इच्छा जागृत झाली.

मला महाविद्यालयीन काळापासूनच स्पर्धा परीक्षांची आवड होती. यूपीएससीसाठी मी प्रथम आदिवासी कल्याण संचलित नागरी सेवा प्रशिक्षण केंद्रात काही दिवस मार्गदर्शन घेतले. त्यानंतर मी तिरुवनंतपुरममध्ये गेली आणि तेथे तयारी केली. यासाठी आदिवासी विभागाने मला आर्थिक मदत केली. मुख्य परीक्षेसाठी मी मुख्य विषय म्हणून मल्याळमची निवड केली. मुख्य परीक्षेनंतर जेव्हा माझे नाव मुलाखत यादीमध्ये आले तेव्हा मला कळले की त्यासाठी मला दिल्लीला जावे लागेल.

त्यावेळी माझ्या कुटुंबाकडे इतके पैसे नव्हते की केरळ ते दिल्ली पर्यंत जाणे मला परवडेल. माझ्या मित्रांना हे कळताच त्यांनी आपापसात देणगी गोळा केली आणि चाळीस हजार रुपयांची व्यवस्था केली, त्यानंतर मला दिल्ली गाठता आली. तिसर्‍या प्रयत्नात मला यश मिळाले.

परीक्षेचा अंतिम निकाल येण्याच्या आदल्या दिवशी मी माझ्या मित्राबरोबर तिरुअनंतपुरममध्ये होतो, निकालाची वेळ जवळ येत असतानाच माझा ताण वाढला होता. निकालानंतर सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव सुरु झाला तेव्हा मला विश्वास बसत नव्हता की मी ही परीक्षा उत्तीर्ण झाले आहे.

यानंतर मी माझ्या आईला फोन करून ही माहिती दिली, परंतु तोपर्यंत बरीच मीडियावाले माझ्या घरी पोहोचले, माझे घर अत्यंत वाईट अवस्थेत होते. मला यापेक्षाही अधिक यशाची अपेक्षा होती. मला नेहमीच वाटते की प्रयत्न करण्याचा आणि सफलता मिळवण्याची जिद्द आपल्याला नक्कीच यशस्वी करू शकते.

Visit : Policenama.com