आईचा पाठींबा आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर लेकींन पेरूत कमावले २ लाख रुपये

नारायणगाव : पोलिसनामा ऑनलाईन – शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होताना दिसत आहे. अगदी ग्रामीण भागातही याचा प्रसार झाला आहे. अलीकडच्या काळामध्ये स्त्रियाही शेती करण्यासाठी आग्रही असल्याचे दिसत आहे. याचेच एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे खोडद येथील यु ट्यूबच्या माध्यमातूम मिळालेल्या माहितीच्या आधारे जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मायलेकींनी एक एकर क्षेत्रात पेरूची बाग तयार केली आहे.

खोडद येथील जयश्री पंढरीनाथ भोसले (वय ५५) व पार्वताबाई बन्सीलाल घंगाळे ( वय ७४) या मायलेकींनी आपल्या अडीच एकर क्षेत्रातील एक एकर मध्ये तैवान पिंक या जातीच्या पेरूची लागवड केली आहे.जयश्री भोसले यांचा मुलगा जयविजय भोसले हा त्यांना शेतीसाठी भांडवल पुरवतो.शेतातील मालाला एखाद्या वेळी बाजारभाव नाही जरी मिळाला तरी जयविजय हा त्यांना मानसिक आधार देऊन पाठबळ देतात.इतरांच्या तुलनेत जयश्री भोसले यांचं शिक्षण कमी असेलही पण त्यांचे कष्ट आणि त्यांच्या शेतातील प्रत्येक पिकाची गुणवत्ता यांची तुलना इतरांशी होणार नाही इतकी उत्कृष्ट अशी शेती जयश्री भोसले करत आहेत.

जयश्री भोसले यांना असलेल्या अडीच एकर क्षेत्रापैकी त्यांनी एक एकर मध्ये पेरू,पाऊण एकर मध्ये गोंडा आणि अर्धा एकर मध्ये कांदा लागवड केली आहे.तैवान पिंक या जातीच्या पेरूची झाडं पंधरा महिन्यांची झाली असून पेरू काढायला सुरुवात झाली आहे.पेरूला सध्या ५० ते ६० रुपये प्रति किलो असा बाजारभाव मिळत आहे.आतापर्यंत एक टन मालाची विक्री केली आहे.

जुलै २०१९ मध्ये एक एकर क्षेत्रात १०३० पेरूची झाडं लावली आहेत.रासायनिक खते टाळून जीवामृत,सेंद्रिय खत,मळी, कम्पोस्ट खताचा वापर केला आहे.एकरी २ लाख रुपये खर्च आला आहे.चालू वर्षी अंदाजे १३ टन माल निघेल.

पुरूषप्रधान संस्कृती महिलांचं कौतुक करत नाही
शेतीतून दोन ते तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळतं,इतरांनी एखादं पीक घेतले म्हणून आपण तेच पीक घ्यावं हे गरजेचे नाही.कष्ट,आणि सातत्य महत्वाचं आहे.महिला पुरुषाच्या बरोबरीने कष्ट करतात किंवा पुरुषाची जागा भरून काढतात पण पुरूषप्रधान संस्कृती महिलांचं कौतुक करत नाही.मला शेतीमधील काही माहिती हवी असल्यास मी यु ट्यूबवर माहिती शोधून त्या माहितीनुसार शेतात विविध प्रयोग करते. असे जयश्री भोसले यांनी सांगितले