Black Rice In Nashik : राज्यात नाशिकमध्ये पहिल्यांदाच बहुगुणी ‘ब्लॅक राईस’चा प्रयोग यशस्वी

नाशिक : पोलिसनामा ऑनलाईन – स्वास्थवर्धक अनेक गुणधर्म असणारा ब्लॅक राईस (काळा तांदूळ ) देशाच्या उत्तर पूर्व राज्यांमध्ये पिकवला जातो. मात्र नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे ब्रम्हा व्हॅलीचे राजाराम पानगव्हाणे यांची ब्लॅक राईसच्या उप्तादनास सुरुवात केली आहे. पानगव्हाणे यांनी अकरा एकरात ब्लॅक राईसची लागवड केली. पारंपरिक धान्याऐवजी काळा तांदूळ कमी दिवसात व कमी खर्चात उत्पादन घेऊन आज चांगले आणि मोठ्या प्रमाणात लोंब्या आल्या आहेत. आता भातपीक कापणीवर आल्यामुळे संपूर्ण शेतात काळ्या लोंब्यांनी बहरले आहे. सेंद्रीय पद्धतीने धान्याची लागवड केल्यामुळे रासायनिक खतांवर होणारा खर्चही कमी झाला आहे. कमी दिवसात चांगले उत्पादन होणार असल्याची ग्वाही पानगव्हाणे यांनी यावेळी दिली.

कॅन्सरसह विविध आजारासाठी हा तांदूळ गुणकारी
ब्लॅक राईस मध्ये फायबर,मिनरल्स आणि उत्कृष्ट गुणवत्ता असलेले वनस्पतीयुक्त प्रोटीन आहे. या तांदळाच्या बाहेरील आवरणामध्ये सर्वात जास्त गुणधर्म आहेत. त्यामुळे कॅन्सरसह विविध आजारासाठी हा तांदूळ निश्चितच गुणकारी असल्याचे सिद्ध झाले आहे.‘ब्लॅक राईस’खाणे आरोग्यवर्धक असल्यामुळे वॉलमार्टसह इतर सुपर बाजारामध्ये सेंद्रीय पद्धतीने पिकविलेल्या काळ्या तांदळाला चांगला भाव मिळतो. त्यामुळे‘ब्लॅक राईस’हा उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी निश्चितच वरदान ठरणार असल्याचे पानगव्हाणे यांनी सांगितले.

चीनमध्ये ब्लॅक राईस’ची लागवड
ब्लॅक राईस (काळा तांदूळ ) बहुतेक जणांसाठी नवीनच आहे कारण महाराष्ट्रात
दैनंदिन भोजनात पांढरा ब्राऊन तांदळाचा वापर नेहमीचाच असतो. खूप वर्षांपूर्वी चीनमध्ये राजघराण्यातील लोकांसाठी ब्लॅक राईस’ची लागवड केली जात होती. त्यामुळे या तांदळाचे नाव असे ठेवण्यात आले. या तांदळातील वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मामुळे युरोप व अमेरिकेपर्यंत याचा प्रसार झाला आणि त्यावर संशोधन होऊन औषधी गुणधर्म असल्याचे सिद्ध झाले.