हृदयाच्या तीव्र विकाराने पिडीत असणाऱ्या ४५ वर्षीय व्यक्तीवर हार्निया शस्त्रक्रिया यशस्वी; पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयात झाली शस्त्रक्रिया

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – हृदयविकाराने पिडीत त्यातच बेंबीला हार्निया झालेल्या एका ४५ वर्षीय व्यक्तीवर जटील शस्त्रक्रिया करून त्याचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांन यश मिळाले आहे. पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयात ही शस्त्रक्रिया करण्यात आली. हार्नियाचा त्रास ही सर्वसामान्य समस्या असून अनेकांना हा त्रास उद्भवतो. परंतु, कार्डिओमायोपॅथी हा हृदयविकार आजार असल्याने या रूग्णांचे हृदयाचे पंम्पिग केवळ २० टक्के इतकेचं होते. अशा स्थितीत हार्निया शस्त्रक्रिया करणं खूपच अवघड होते. परंतु, डॉक्टरांनी हे आव्हान स्विकारून रूग्णाच्या पोटातून आठ लिटर पाणी काढले आहे. पुण्याच्या अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील लेप्रोस्कोपिक सर्जन डॉ. अविनाश वाघ यांच्या नेतृत्वाखाली अन्य डॉक्टरांच्या टीमने ही शस्त्रक्रिया यशस्वी केली आहे.

शेखर परदेशी हे पुण्यात राहणारे असून व्यवसायाने इंजिनियर आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून त्यांना ओटीपोटात तीव्र वेदना होणं, पोटात पाणी साचणे आणि वजन कमी होणे असा त्रास जाणवत होता. मागील चार वर्षांपासून हा रूग्ण बेरोजगार असल्याने घरातच होता. प्रकृती खूपच खालावू लागल्याने कुटुंबियांनी त्यांना स्थानिक रूग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय चाचणीत त्यांना नाभीचा हार्निया असल्याचे निदान झाले. त्यानुसार औषधोपचार सुरू करण्यात आले. परंतु, तब्येतीत फारसा फरक पडला नाही. हे लक्षात घेऊन पुढील उपचारासाठी त्यांना पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयात हलवण्यात आले. याठिकाणी डॉक्टरांनी केलेल्या उपचारामुळे रूग्णाला नविन आयुष्य मिळाले आहे.

पुण्याच्या अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील लेप्रोस्कोपिक सर्जन डॉ. अविनाश वाघ म्हणाले की, “रूग्णाला अतिशय चिंताजनक स्थितीमध्ये रूग्णालयात आणले होते. पोटात पाणी साचल्याने त्यांना तीव्र वेदना जाणवत होती. पोटाची सोनोग्राफी केली असता नाभीजवळ हार्निया असल्याचे निदान झाले. अशा स्थितीत शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते. परंतु, या रूग्णाला कार्डियोमॅयोपॅथी हा हृदयसंबंधी विकार होता. मुख्यतः हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांची पंम्पिंग क्षमता ६० टक्के असते. परंतु, या रूग्णाच्या हृदयाची पंम्पिंग क्षमता केवळ २० टक्के इतकीच होती. अशा स्थितीत शस्त्रक्रिया करणे अवघड होते. मात्र, तरीही डॉक्टरांनी हे आव्हान स्विकारून रूग्णाला या त्रासातून मुक्त केले आहे.’’

डॉ. वाघ पुढे म्हणाले, “हार्नियामुळे ओटीपोटात पाणी साचून राहिले होते. यामुळे मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका सर्वाधिक होता. याशिवाय हृदयाला त्रास होण्याचीही शक्यता होती. म्हणून शस्त्रक्रिया करण्यापूर्वी एक आठवड्याआधी ओटीपोटातील द्रवपदार्थ मूत्रमार्गाद्वारे हळूहळू कमी करत काढून टाकण्यात आला. हृदयावर भार पडू नये, याचीही पुरेशी काळजी घेण्यात आली होती.’’

“साधारणतः सुमारे अडीच तास शस्त्रक्रिया सुरू होती. कोविड-१९ प्रोटोकॉलचा वापर करूनच ही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. शस्त्रक्रियेनंतर आता रूग्णाला आहारात कमी मीठाचा समावेश करण्याता सल्ला दिला आहे. १५ दिवसानंतर टाके आणि पोटातील पाणी काढण्यासाठी टाकलेली ट्यूब काढून टाकण्यात आली. आता या रूग्णाच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून तो पूर्वीप्रमाणे आयुष्य जगू लागला आहे,” असे डॉ. वाघ यांनी सांगितले.

आपल्या भावना व्यक्त करताना रूग्ण शेखर परदेशी म्हणाले की,“माझ्या नाभीचा भाग सुजलेला होता. गेल्या आठ महिन्यांपासून झाले वजनही कमी झाले होते. आधाराविना मी कोणतेही काम करू शकत नव्हतो. त्यात मला हृदयविकार आणि रक्तदाबाचा त्रास होता. सततच्या आजारपणामुळे मी अक्षरशः खचून गेलो होतो. मला पुन्हा कामावर जाण्याची इच्छा होती. माझ्या कठीण काळात माझ्या कुटुंबाने मला साथ दिली. याशिवाय डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे मला नवीन आयुष्य मिळाले आहे. आता मी पुन्हा आधीप्रमाणे जगू लागलो आहे.