आवडीच्या क्षेत्रात करिअर केल्यास हमखास यश : पोलीस उपायुक्त गणेश शिंदे

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

आज करियरच्या प्रत्येक क्षेत्रात उत्तमोत्तम संधी उपलब्ध असून आपण सामाजिक दबावाला बळी न पडता आवडीचे क्षेत्र निवडावे. एकदा क्षेत्र निवडले की, मग मात्र आपण उत्तम गुण, प्रावीण्य व परिपुर्णता मिळविणे आवश्यक आहे. प्रयत्न करणाऱ्यांना आवडीच्या कोणत्याही क्षेत्रात  यश हमखास मिळते, असे मत पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी व्यक्त केले.

स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या स्पर्धा परिक्षा विभागातील एनडीए लेखी प्रवेश परिक्षा उत्तीर्ण होऊन मुलाखतीसाठी निवड झालेल्या साहील बिर्जे व ऋषीकेश भांगरे यांचा, तसेच मंडळाच्या सभासदांच्या दहावी, बारावीतील उतीर्ण गुणवंत पाल्यांचा आणि  राजगुरूनगर येथील वनवासी विद्यार्थी वसतिगृहातील दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी नोव्हेल इंस्टीट्युटचे संस्थापक अध्यक्ष अमित गोरखे, ब्रिगेडीयर बलजितसिंग गिल, मंडळाचे पदाधिकारी विनोद बन्सल, सदाशिव रिकामे, रमेश बनगोंडे, विनीता श्रीखंडे, रत्नाकर देव, विश्वास करंदीकर, विवेक जोशी, दिपक नलावडे, दिपक पंडीत, आनंद रायचूर, निता जाधव, ऋतुजा नाईक, अंजली चौधरी, माधुरी मापारी, स्वप्नाली पावसकर आदी उपस्थित होते.
[amazon_link asins=’B01N0WVC16′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8e871c71-7886-11e8-89c0-63fe58fa52ea’]

उपायुक्त शिंदे पुढे म्हणाले, “विद्यार्थ्यांनी आपली आवड विचारात घेऊन शिक्षणक्षेत्राची निवड करणे आवश्यक आहे. केवळ  एखाद्या क्षेत्रात संधी मिळण्याची शक्यता आहे. म्हणून तसे शिक्षण घेतल्यास भविष्यात आनंदाने जीवन जगता येण्याची शक्यता कमी होते. नोकरी मिळाल्यानंतर आपल्या पदाचे काम आनंदाने व पुर्ण क्षमतेने केल्यास जीवनात सर्व क्षेत्रात यश मिळविता येते”.

मुलांना मार्गदर्शन करणाऱ्या ब्रिगेडीयर बलजितसिंग गिल व अन्य शिक्षकांचा सावरकर मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. प्रदीप पाटील यांनी प्रास्ताविक केले. भास्कर रिकामे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचा परिचय करुन दिला तर शैलजा सांगळे यांनी सूत्रसंचालन केले.