‘नदी-जोड’ प्रकल्प योजनेची पहिली ‘टेस्ट’ यशस्वी, जाणून घ्या प्रकल्पाबाबत

भोपाळ : वृत्तसंस्था – नदी-जोड प्रकल्प योजनेची पहिली चाचणी यशस्वी झाली असून नर्मदा नदीचे पाणी शिप्रा नदीत सोडण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील जलसंकट दूर होण्यास मदत होणार आहे. जून २०१८ मध्ये या योजनेचे काम हाती घेण्यात आले होते.

नर्मदा-शिप्रा नदीच्या पाण्याचे एकत्रीकरण हा नदी जोड प्रकल्पाचाच एक महत्वाचा भाग आहे. त्रिवेणीजवळ नागफणीसारख्या लावण्यात आलेल्या सहा पाईपांमधून नर्मदा नदीचे पाणी शिप्रा नदीत सोडण्यात आले आहे. शनिवारी एनव्हीडीएच्या अंतिम चाचणीनंतर पाईपाद्वारे एका मिनिटाला १.२० लाख लिटर पाणी शिप्रा नदीत सोडण्यात येत आहे. एनव्हीडीएकडून उज्जैन येथे स्नानपर्वास पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी जून २०१८ मध्ये ६५ किमी पाईपलाईन टाकण्याचे काम हाती घेतले होते. एनव्हीडीएच्या या प्रकल्पामुळे शहरात नर्मदा नदीचे पाणी मिळण्यास सुरुवात झाली आहे.

नदी जोडप्रकल्प –

आंतर नदीच्या पाण्यातील पात्रांचे हस्तांतरण म्हणजे नदी जोड प्रकल्प होय. या प्रकल्पाअंतर्गत देशातील उपलब्ध नद्या, ज्या समुद्राला मिळत नाहीत. त्या नद्यांचे पात्र नियोजित आराखड्याद्वारे इतर नद्यांच्या पात्रांना जोडले जाणार आहे.

नदी जोड प्रकल्पाची पाळेमुळे ब्रिटिश काळापासून भारतात आहेत. वाजपेयी सरकारने हा प्रकल्प पुनरुजीवित केला. महत्वाकांक्षी असलेल्या या प्रकल्पामधून भारतातील शेतीला आणि त्यातून अन्नधान्य स्वावलंबन साध्य करून दुष्काळावर कायमचे नियंत्रण करणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. प्रकल्पांतर्गत संपूर्ण भारतात ३७ नद्यांना ३० जोड देण्यात येणार आहेत. दुष्काळ किंवा शेतीला कमी पाणी ही पश्चिम आणि दक्षिण भारतासाठी गंभीर समस्या आहे. देशातील सुमारे ३५ टक्के नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो.