मीरारोड येथील वोक्हार्ट रूग्णालयात यशस्वी उपचार ! अपघातात दुखापत झालेल्या 26 वर्षीय तरुणाचे डोळे वाचवण्यात डॉक्टरांना यश

मिरारोड : पोलीसनामा ऑनलाइन –   अपघातात चेहऱ्यावर गंभीर दुखापत झालेल्या एका २६ वर्षीय तरूणाचे डोळे वाचवण्यात मीरारोड येथील वोक्हार्ट रूग्णालयातील डॉक्टरांना यश आले आहे. अपघातामुळे डोळ्याला लागल्याने या तरुणाची दृष्टी जाण्याचा धोका होता. परंतु, डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे त्यांची दृष्टी वाचण्यात डाँक्टरांना यश आले आहे. आता या तरूणाची प्रकृती उत्तम असून त्याला घरी सोडण्यात आले आहे.
पालघरमध्ये राहणारा यश कनोजिया या तरुणाचा दुचाकीवरून प्रवास करत असताना अपघात झाला. या अपघातात त्याच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याला उपचारासाठी तातडीने स्थानिक रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्याला मीरारोड येथील वोक्हार्ट रूग्णालयात हलवण्यात आले.

मीरारोड येथील वोक्हार्ट रूग्णालयातील कन्सल्टंट मॅक्सिलोफेसियल सर्जन डॉ. अब्दुल हमीद म्हणाले, “उपचारासाठी रूग्णालयात आणणे तेव्हा रूग्णाची प्रकृती खूपच चिंताजनक होती. चेहऱ्यावर गंभीर दुखापत असल्याने अशा स्थितीत तातडीने सीटीस्कॅन करण्यात आले. या वैद्यकीय चाचणीत असे दिसून आले की, या रूग्णाच्या डोळ्याभोवती असलेल्या चेहऱ्यावरील हाडांना अनेक फ्रॅक्चर होते. वेळीच उपचार मिळाले नसते तर दृष्टी जाऊ शकली असती. हे लक्षात घेऊन लगेचच डोळ्याच्या बाहेरील भागातील हाडांचे फ्रॅक्चर शस्त्रक्रियेद्वारे दुरूस्त करण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर त्यांना आवश्यतेनुसार औषधोपचार देण्यात आले होते.”

डॉ. हमीद पुढे म्हणाले, “आणखी गुंतागुंत टाळण्यासाठी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही शस्त्रक्रिया साधारणतः तीन ते चार तास चालली. मुळात गंभीर स्थितीत असतानाही वेळेवर निदान व उपचार झाल्यास रूग्णाचे प्राण वाचवता येऊ शकते.”

रूग्णाचे वडील पापु कनोजिया म्हणाले की,“मुलाचा अपघात झाल्याने आम्ही घाबरून गेलो होते. या अपघातामुळे चेहऱ्याला दुखापत झाली होती. डोळ्यांनाही मार लागल्याने दृष्टीवरही परिणाम झाला होता. परंतु, डॉक्टरांनी आम्हाला धीर देऊन मुलाचे डोळे वाचविण्याचे आश्वासन दिले. फक्त डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे माझ्या मुलाचे डोळे वाचू शकले. २०२१ मध्ये आमच्या मुलाला नवीन आयुष्य मिळाले आहे.”