नव्या केवडिया रेल्वे स्टेशनचा असाही ‘विक्रम’; PM दाखवणार ‘स्टॅच्यु ऑफ युनिटी’वरुन जाणार्‍या 8 गाड्यांना हिरवा झेंडा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशातील विविध भागाना केवडिया रेल्वे स्टेशनशी जोडणार्‍या ८ रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखविणार आहे. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि केंद्रीय रेल्वेमंत्री पीयुष गोयल हेही या ऑनलाईन सोहळ्यात सहभागी होणार आहे. याबरोबरच नव्याने तयार करण्यात आलेल्या केवडिया रेल्वे स्टेशन (Kevadia railway station) एक नवा विक्रम करणार आहे. एकाच स्टेशनशी जोडणार्‍या ८ गाड्या सुरु होण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे.

या गाड्या केवडिया वाराणसी, दादर, अहमदाबाद, हजरत निजामुद्दीन, रीवा, चेन्नई आणि प्रतापनगरला जोडतील अहमदाबाद – केवडिया जनशताब्दी एक्सप्रेस या रेल्वेगाडीला व्हिस्टा डोम टुरिस्ट कोच असणार आहेत. हे डबे रुफटॉप ग्लासेसचे असणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना बसल्या जागेवरुन परिसरातील निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेता येणार आहे.

जगातील सर्वात उंच अशा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यु ऑफ युनिटी या स्थळाला देशभरातील नागरिकांना भेट देता यावी, यासाठी २० कोटी रुपये खर्च करुन खास केवडिया रेल्वे स्टेशन बांधण्यात आले आहे. या शिवाय केवडिया रेल्वे स्टेशन बडोदा रेल्वेमार्गाशी जोडले जावे यासाठी वाटेतील दाभोई -चांदोड नॅरो गेज रेल्वे मार्गाचे रुपांतर ब्रॉडगेजमध्ये करण्यात आले आहे.

या ८ रेल्वे गाड्यांबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दभोई -चांदोड आणि चांदोड -केवडिया नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग, नव्याने विद्युतीकरण झालेला प्रतापनगर -केवडिया विभाग, दाभोई, चांदोड नवीन रेल्वे स्टेशनच्या इमारतींचे उद्घाटन करणार आहेत.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला भेट देण्यासाठी जाणार्‍यांना बडोदाहून जावे लागत होते. बडोद्याहून हे ठिकाणी ७७ किमी आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी केवडिया येथे रेल्वे स्टेशन उभारण्यात आले आहे. रेल्वे स्टेशनपासून स्टॅच्यु ऑफ युनिटी हे स्थळ केवळ ५ किमी अंतरावर आहेत. त्यामुळे प्रवाशांना थेट स्टॅच्यु ऑफ युनिटीला भेट देता येणार आहे.