वर्ध्यात शिक्षक बदलीप्रक्रियेत अशी ही हेराफेरी

वर्धा :पोलीसनामा ऑनलाईन

वर्धा येथे जवळची शाळा मिळवण्यासाठी एका शिक्षिकेने चक्क मृत असलेल्या मुलाला जिवंत केल्याची घटना उघडकीस आली आहे. वर्धा पंचायत समितीच्या शिक्षिकेला आता चौकशी अंती निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपाल अधिकाऱ्यांनी ही कार्यवाही केली. या प्रकरणाबाबत इतर शिक्षकांचा अहवाल तयार करून तो मार्गदर्शनाकरिता वरिष्ठांकडे पाठविला असल्याची माहिती आहे.

बदल्यांसाठी शिक्षकांनी वापरले नवनवीन फंडे

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीत वर्ध्यात अनेक आश्चर्यजनक प्रकार घडल्याचे पाहायला मिळाले आहे. आपली बदली लांब होऊ नये याकरिता वेगवेगळे फंडे शिक्षकांनी वापरल्याचे उघडकीस आले आहे. यात एका शिक्षिकेने पती गडचिरोलीला असताना आपण एकत्र राहात असल्याचे  दाखवले आहे. तर दुसऱ्या एका शिक्षिकेने विवाहित असताना कुमारिका असल्याचे दाखवले आहे. इतकेच काय तर एका शिक्षिकेने दोन वर्षांपूर्वी मृत झालेल्या मतिमंद मुलगा जिवंत असल्याचे दाखविले आहे. हे प्रकारणे उघडकीस आल्यानंतर याबाबत चौकशी करण्यात आली. जवळची शाळा मिळविण्याकरिता अनेक शिक्षकांनी शाळेपासूनच्या अंतरात घोळ घालत  २२ किलोमिटरचे अंतर ५२ किलो मिटर दाखविल्याचे समोर आले आहे. असे अनेक प्रकार चौकशी दरम्यान उघडकीस आले आहे. अशा प्रकारची एकूण १८ प्रकरणे तालुक्यातून समोर आली आहेत. तर जिल्ह्यातून ५२ प्रकरणे समोर आली आहेत या प्रकरणावर चौकशी पूर्ण झाली असून कार्यवाही करण्यासंदर्भात वरिष्ठांना मार्गदर्शन मागविण्यात आले आहे.

याचबरोबर ,जिल्हातंर्गत बदलीत अनेक शिक्षकांनी रापममधून अंतराचे प्रमाणपत्र आणले आहे. यात अनेक अंतर नियमात बसविण्याचा प्रकार झाला आहे. यामुळे हा प्रकार शासनाची दिशाभूल करणारा आहे. म्हणूनच रापमचे अंमर ग्राह्य धरू नये अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाने केली आहे.