मशीद हल्ल्याच्या Fake News साठी सुदर्शन न्यूजवर FIR दाखल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  फेक न्यूज आणि हिंसात्मकतेच्या प्रसारासाठी अनेकदा वादात अडकलेल्या सुदर्शन न्यूज या वृत्तवाहिनी विरोधात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. 15 मे रोजी प्रसारित केलेल्या बिनधास्त बोल या कार्यक्रमात सौदी अरबच्या मदीना स्थित अल मस्जिद अन नबावीवर क्षेपणास्र टाकल्याचे रुपांतरीत ग्राफिक्स दाखवून फेक न्यूज दिल्याबद्दल चॅनल विरोधात मुंबईतील पायधनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. चॅनलचा मुख्य संपादक सुरेश चव्हाणके हा स्वत: हा कार्यक्रम सादर करतो. दरम्यान यावर चॅनलने स्पष्टीकरण देताना ग्राफिक्सचा वापर कलात्मक स्वातंत्र्य असल्याचा दावा केला आहे.

बिनधास्त बोल या कार्यक्रमात सौदी अरबच्या मदीना स्थित अल मस्जिद अन नबावीवर क्षेपणास्र टाकल्याचे रुपांतरीत ग्राफिक्स दाखवले होते. आपल्या शत्रूंचा आणि जिहादींचा योग्य पद्धतीने खात्मा करण्यासाठी आपण इस्राईलच समर्थन करायला हवे, असे म्हणताना संपादक सुरेश चव्हाणके या कार्यक्रमात दिसला होता. यासंबंधात रझा अकॅडमीच्या एका प्रतिनिधी मंडळाने मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त सुनील कोल्हे यांची भेट घेऊन चॅनलविरोधात कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे चॅनल आणि चॅनलचा संपादक अडचणीत आला आहे. तसेच इंडियन सिव्हिल लिबर्टीज युनियनने केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहून या कार्यक्रमावर आक्षेप व्यक्त केला आहे. भावना भडकावणारा, आक्षेपार्ह आणि हिंसाचाराला प्रोत्साहन देणारा कार्यक्रम चॅनलवरून प्रसारीत केला जात असल्याचा आरोप केला आहे. तसेच यामुळे भारताचे सौदी अरबशी असलेल्या संबंधांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली आहे.