मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी दिली अचानकपणे शिवभोजन केंद्रास भेट

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नाशिकमध्ये दौऱ्यावर असताना त्यांनी आवर्जून वेळ काढून वडाळा नाका रस्त्यावरील द्वारकामाई बचत गटाच्या शिवभोजन केंद्राला भेट दिली. त्यांनी तेथील व्यवस्था व लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्वस्त दरात भोजन मिळत असल्याचे भाव पाहून समाधान व्यक्त केले. भोजन करणाऱ्यांशी संपर्कही साधला आणि त्यांची विचारपूसही केली. एवढेच नाही तर त्यांनी केंद्र चालवणाऱ्यांना भोजनाचा दर्जा राखण्याची सूचनाही केली.

ठाकरे हे मागचे दहा दिवस नाशिकमध्ये असून जिल्हाधिकारी कार्यालयाचा आढावा घेण्यासाठी ते आले होते. त्याचवेळी त्यांनी तेथील शिवभोजन केंद्राला भेट देतील म्हणून तशी तयारी केली गेली होती. पण बैठकीत व्यस्त असल्यामुळे ते भेट देऊ शकले नाहीत. पण ते रविवारी राज्यस्तरीय वकील परिषदेच्या निमित्ताने नाशिकमध्ये आले असताना त्यातून वेळ काढत तेथील शिवभोजन केंद्राला दुपारी बारा वाजता भेट दिली. त्यासाठी पोलिसांनी उपाहारगृहाजवळ बंदोबत केला होता. दरम्यान शिवभोजन थाळी खाण्यासाठी आलेले ग्राहक उत्सुक झाले. तेव्हा ठाकरे यांनी उपाहारगृहाला भेट देत लाभार्थ्यांना भोजनाच्या दर्जाबाबत विचारल्यावर त्यांनीही समाधान व्यक्त केले.

दरम्यान त्यांना बचत गटाच्या अध्यक्षा अलका चहाळे, मंगला चहाळे यांच्याशीही संवाद साधला. यावेळी त्यांच्या समवेत माजी खासदार समीर भुजबळ, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर, तहसीलदार पंकज पवार हेही उपस्थित होते.