अचानक बदललेल्या लाईफ स्टाईलने तो फसला आणि पोलिसांच्या जाळ्यात सापडला

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन- पुण्यातील खडक पोलीस ठाण्यातंर्गत चोरीला गेलेल्या सोन्याचे दागिने व रोकड असा ९ लाख रुपयांचा आणि नांदेडच्या शिवाजीनगर भागातील भाग्यलक्ष्मी सुपर मार्केटमधून ३ लाख २८ हजार रुपयांचा दरोडा घालणाऱ्या आरोपीला नांदेड पोलिसांनी अटक केली आहे. अचानक बदललेल्या लाईफ स्टाईलने तो फसला. शेजाऱ्यांना त्याचा संशय आला तसेच पोलिसांच्या कानावर त्याच्या लाईफ स्टाईलची माहिती पोहचली आणि तो पोलिसांच्या जाळ्यात अलगद अडकला. त्याच्याकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील इकळीमोर येथे राहणाऱ्या विलास दिगंबरराव पांचाळ यांच्या राहणीमानात अचानक फरक झाला. एका रात्रीच चैनीत राहू लागलेल्या विलासला अचानक कसा, कुठला आर्थिक फायदा झाला याची चर्चा होऊ लागली आणि याची गुप्त माहिती नांदेड पोलिसांना मिळाली आणि पोलिस तपासात तो गजाआड झाला.

पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी सांगितले की, गेल्यावर्षी भाग्यलक्ष्मी सुपर मार्केट येथून चोरी झालेल्या प्रकरणाचा तपास करत असताना, इकळीमोर येथे राहणाऱ्या विलासच्या ऐशो आरामात आणि स्टाईलमध्ये वावरण्याचा संशय आलेल्या खबऱ्यांनी याची माहीती पोलिसांना दिली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन विचारपूस केली. त्यानुसार त्याने भाग्यलक्ष्मी सुपर मार्केट येथे चोरी करुन सोन्याचे दागिने पळविले होते. त्यातील तीन लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

तसेच पुण्याच्या खडक पोलीस ठाण्यातंर्गत सोन्या-चांदीच्या व्यापाऱ्याने आपले दागिने दुचाकीच्या डिक्कीत ठेवले आणि तो बाजूला आपल्या सहकाऱ्याशी बोलत असतानाच गाडीसह आरोपी पांचाळने सोन्याचे दागिने व रोकड असा एकूण ९ लाख रुपयांचा ऐवज पळविला होता. नांदेड पोलिसांनी हा ऐवज जप्त केला असून या दोन्ही प्रकरणातील आरोपी असलेल्या पांचाळ यास अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून आणखी काही माहिती उघडकीस येण्याची शक्यता असून, महाराष्ट्रातल्या त्यांच्या साथीदारांचा यात काही सबंध आहे का याचा तपास पोलीस करीत असल्याचे संजय जाधव यांनी सांगितले.