आवाजाने जमीन दुभंगली, महिला जिवंत गाडली गेली

रांची: झारखंडमधील धनबाग येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. झरिया परिसरातील बस्ताकोला येथे ही घटना घडली आहे. शुक्रवारी सकाळी एक ३५ वर्षीय महिला कल्याणी देवी शौचासाठी जात होती. तेवढ्यात अचानक तिच्या पायाखालील जमीन मोठा आवाज होऊन दुभंगली. त्यानंतर ही महिला जिवंत जमिनीत गाडली गेली. त्यानंतर घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात धूर येऊ लागला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

दरम्यान, घटनास्थळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. महिलेच्या कुटुंबीयांनी दोरीच्या मदतीने तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तो यशस्वी होऊ शकला नाही. जमिनीतुन निघणारा धूर हा विषारी गॅसमुळे आल्याचे सांगण्यात येत आहे. जमिनीमधून अचानक गॅस बाहेर आला आणि त्यामुळे जमीन फाटून ही घटना घडल्याचेही सांगितले जात आहे. या प्रकारानंतर संतप्त झालेल्या लोकांनी रास्ता रोको करत वाहतूक अडवली. तसेच घटनास्थळावर तत्काळ मदत कार्य सुरू करण्याची मागणी केली.

स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, ज्यावेळी महिला खड्ड्यात पडली तेव्हा ती जिवंत होती. तसेच मदतीसाठी आरडाओरडा करत होती. मात्र स्थानिकांनी दोरी टाकून तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता तिचा आवाज येणं बंद झालं होतं.त्यानंतर घटनास्थळावर प्रशासनाकडून मदत कार्य सुरू करून महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. जिथे जमीन दुभंगली होती. तिथून मोठ्या प्रमाणावर विषारी वायू बाहेर येत होता. दरम्यान, या परिसरातील मोठ्या भागात अशा प्रकारची दुर्घटना पुन्हा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मृत महिलेच्या कुटूंबाला मदत
या घटनेनंचर प्रशासनाने मृत महिलेच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपये, मुलांच्या शिक्षणाची सोय आणि पतीला नोकरी दिली आहे. झरियाच्या अनेक भागांत जमिनीखाली अनेक दशकांपासून आग धुमसत आहे. तसेच या परिसरात नेहमीच अशा घटना घडत असतात अशी माहिती समोर आली आहे.