जात्यातील मराठेंच्या जामीनामुळे सुपातल्यांनी सोडला सुस्कारा

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन 

अधिकाराचा गैरवापर करुन बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना कर्ज दिल्याप्रकरणी जात्यात आलेले महाराष्ट्र बँकेचे अध्यक्ष व मुख्य व्यवस्थापकीय संचालक रवींद्र मराठे यांना अखेर सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्यामुळे पुणे पोलिसांच्या रडार असलेले सुपातल्या असंख्य बँक अधिकारी, फायनान्स कंपन्यांच्या प्रमुखांनी सुस्कारा सोडला. त्याचवेळी अगोदर संमती दिल्यानंतरही कुटुंबप्रमुख आणि मुख्यमंत्री व गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे कानपिचक्या दिल्याने पुणे पोलीस याप्रकरणात एकदम बॅकफुटवर आले असून याविषयी एकही अधिकारी बोलायला तयार नाही.

बांधकाम व्यावसायिक डी एस. कुलकर्णी यांची आर्थिक परिस्थिती डबघाईला आलेली असतानाही त्यांना आपल्या अधिकाराचा गैरवापर करुन कर्ज मंजूर केल्याबद्दल पुणे पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेने रवींद्र मराठे यांच्यासह चार बँक अधिकाऱ्यांना अटक केली. त्यातून आर्थिक क्षेत्रात एकच खळबळ माजली. राष्ट्रीयकृत बँकेच्या अधिकाऱ्यांना अटक करायची असेल तर अगोदर रिझर्व्ह बँकेची परवानगी घ्यावी लागते. एमपीआयडीखाली अटक करता येत नाही. गृहमंत्र्यांना अंधारात ठेवून ही अटक झाली असे अनेक आरोप बँकेशी संबंधितांकडून करण्यात येऊ लागले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत तक्रारी गेल्या. मागील आठवड्यात ते आले असताना त्यांनी मराठे यांच्या अटकेबाबत पोलीस अधिकाऱ्यांकडून जाणून घेतले. तेव्हा त्यावर कोणतेही प्रतिकुल मत व्यक्त केले नव्हते. मात्र, मुंबईला गेल्यानंतर अचानक त्यांचे मत बदलले. त्यांनी मराठे यांच्या अटकेबाबत अतिरिक्त पोलीस महासंचालकामार्फत चौकशी करण्याचे आदेश देऊन टाकले. आपलाच बॉस अशी भूमिका घेत आहे, म्हटल्यावर त्याविरुद्ध जाऊन अटकेचे समर्थन करणेही नोकरदार पोलीस अधिकाऱ्यांना अवघड होऊन बसले. त्यामुळे ते सर्व मौनात गेले. जर आपल्याच बॉसला अटक पसंत नसेल तर आम्ही काय आमचे घरचे काम करीत होतो का अशी प्रतिक्रिया या अधिकाऱ्यांमधून खासगीत उमटू लागली.

दुसरीकडे पोलिसांच्या कारवाईचे समर्थन करणाऱ्यांची संख्या मात्र मर्यादित होती. त्यात राजकीय नेत्यांना या प्रकरणाची काहीही माहिती नसताना आपली पोळी भाजून घेण्याची आयती संधी मिळाली. त्यांनी पोलिसांवर तोंड सुख घेणे सुरु केले. त्यामुळे पोलीस अधिकारी आणखीच मागे हटले.

त्याचवेळी मराठे यांच्या अटकेने भयभीत झालेले अन्य बँक अधिकारी काहीसे निवांत झाले. डी. एस. के यांना महाराष्ट्र बँकेबरोबरच अन्य पाच बँकेने त्यांना अशाच पद्धतीने कर्ज दिले आहे. सहा बँकांनी मिळून डीएसके यांना ६००कोटी रुपये मंजूर केले होते. त्यापैकी ३३७ कोटी रुपये प्रत्यक्ष वितरीत करण्यात आले आहेत. त्यामध्ये ८० कोटी रुपये महाराष्ट्र बँकेने दिले असून इतर बँकांनी उरलेले पैसे दिले आहेत. २५० कोटी रुपये इतर ५ बँकांनी दिले आहेत. आता महाराष्ट्र बँकेनंतर पोलिसांच्या रडारवर इतर बँका होत्या. त्यांनीही डीएसके यांच्या वलयाला भुलून तसेच अधिकाराचा गैरवापर करुन कर्ज मंजूर केले काय याची चौकशी सुरु होणार होती. त्यामुळे हे बँक अधिकारीही भयभीत झाले होते. त्यातूनच ही आरडाओरड सुरु झाली होती.

बँकेच्या कर्जापेक्षाही सर्वात मोठा प्रश्न डीएसके यांनी फ्लॅटधारकांची फसवणूक त्यापेक्षा मोठी आहे. डीएसके यांच्याकडे जवळपास ९०० जणांनी फ्लॅटचे बुकींग केले होते. त्यापैकी कोणालाही ताबा मिळालेला नाही. त्यांनी आधी ताबा नंतर ईएमआय अशी योजना काढली होती. त्यात जोपर्यंत घराचा ताबा मिळत नाही तोपर्यंत कर्जाचा ईएमआय कंपनी भरणार होती. डीएसके यांनी ज्या फायनान्स कंपन्या, बँकांबरोबर टायअप केला होता. त्यांच्याकडून कर्ज घेतले आहे. गृहकर्जामध्ये बांधकाम जसे पूर्ण होत जाईल, त्यानुसार कर्जाचा हप्ता बँकेकडून बांधकाम व्यावसायिकाच्या खात्यात जमा केला जातो. डीएसके यांच्याकडील फ्लॅटची किंमत साधारण ६० ते ७५ लाख रुपयांना होती.

पण इथंही महाराष्ट्र बँकेप्रमाणे फायनान्स कंपन्यांनी डीएसके यांच्या वलयाला भुलून व त्यांची मर्जी संभाळून वाटेल तशी फ्लॅटधारकांच्या कर्जाची रक्कम डिएसके यांच्या खात्यात वळती केली आहे. काही जणांचा फ्लॅट १४ व्या मजल्यावर आहे. पण इमारतीचा केवळ ६ व्या मजल्यापर्यंतचा सांगाडा उभा आहे. असे असताना ६० लाखांच्या कर्जापैकी ५४ लाख रुपये फायनान्स कंपनीने डीएसके यांना दिल्याची अनेक उदाहरणे आहेत. फारसे काम झालेले नसतानाही डीएसके यांनी जवळपास ९०० फ्लॅटधारकांचे ९० टक्के कर्ज कर्ज या फायनान्स कंपन्यांना हाताशी धरुन आपल्या खिशात घातले आहेत. याची रक्कम हजारो कोटी रुपयांच्या वर जाते.

बँकांच्या कर्जाच्या पाठोपाठ या फायनान्स कंपन्याही जात्यात येणार होत्या त्यामुळे सर्वच जण भयभीत होते. त्यातूनच सामुहिकपणे मराठे यांच्या अटकेला विरोध करण्यात येत असल्याचे बोलले जाऊ लागले. या आर्थिक लॉबीच्या दबावामुळ पोलीसही दबून गेले व ते बॅकफुटवर आले. त्यामुळे आता सुपातल्या या सर्वांनी सुस्कारा सोडला आहे.