दुर्दैवी ! मित्रांना वाचविताना तरुणाचा बुडून मृत्यू

पोलीसनामा ऑनलाइन – कुर्ली-घोणसरी धरणाच्या कालव्यातील धबधब्यात पोहताना बुडणार्‍या दोघा मित्रांना वाचविण्यास गेलेल्या तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. सुदैवाने या दुर्घटनेतून दोघे तरुण बचावले. सोमवारी (दि. 29) दुपारी एकच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सुधीर गोविंद कदम (वय 30, रा. कोकिसरे-नारकरवाडी, मूळ  रा. पाडळी खुर्द, ता. करवीर, जि. कोल्हापूर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

वैभववाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रंगपंचमी असल्याने कोकिसरे-वैभववाडी येथील 7 ते 8 तरुण मौजमजेसाठी कुर्ली -घोणसरी धरण परिसरात गेले होते. यातील काहीजण पोहण्यासाठी धरणाच्या पाण्यात उतरले होते. यावेळी दोघे तरुण पाण्यात बुडताना त्यांना वाचविण्यासाठी सुधीरने पाण्यात उडी मारून या दोघांना भोवर्‍यातून बाहेर काढले. मात्र स्वतः तो धबधब्याच्या भोवर्‍यात अडकला. त्याला अन्य मित्रांनी बाहेर काढून त्याच्या पोटातील पाणी बाहेर काढले. दरम्यान त्याला वैभववाडी येथे उपचारासाठी घेऊन जातांना वाटेतच त्याचा मृत्यू  झाला. घटनेचा पंचनामा वैभववाडी पोलिसांनी केला. वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनावणे यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. अधिक तपास पोलिस राजू जामसंडेकर करत आहे.

सुधीरचे चार चाकी गाड्यांच्या दुरूस्तीचे गॅरेज होते. तो कोकिसरे येथे गेल्या 4 वर्षांपासून कुटुंबासह राहत होता. त्याचा एक वर्षापूर्वीच विवाह झाला होता.  त्याच्या पश्चात पत्नी, आई, वडील, भाऊ  असा परिवार आहे.