‘राज्य सरकारला प्रश्न सोडवण्यात अपयश, म्हणून 365 दिवस शिमगा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या ‘जनराज्यपाल – भगतसिंह कोश्यारी’ या कॉफी टेबल पुस्तकाचा संदर्भ घेत एक खरमरीत असे पत्र लिहले आहे. त्यावरुन आता “राज्य सरकारला काही प्रश्न सोडवण्यात १०० टक्के अपयश आले असून, त्यांनी ३६५ दिवस शिमगा ही नवीन पद्धत सुरु केली आहे,” असे टीकास्त्र भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सोडले आहे.

एका मराठी वृत्तवाहिनीला बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “मी शरद पवार यांचे अभिनंदन करतो. त्यांचे पोस्टमनवर प्रेम आहे. प्रत्येक गोष्ट ते पत्राच्या द्वारे पत्राचा उपयोग करुन पोस्ट विभागातून आपले प्रेम व्यक्त करतात. खरेतर एक नवीन पद्धत आली आहे. पहिल्यांदा ३६५ दिवसांपैकी एक दिवस शिमगा असायचा. आता नवीन पद्धतीत शिमगा आणि शिमग्याचा रंग म्हणजे पत्र. राज्यपालांवर टीका करायची, राष्ट्र्पतींवर टीका करायची, निवडणूक आयोगावर टीका करायची, ईव्हीएम मशीनवर टीका करायची, मग कधी सीबीआयवर टीका करायची. त्यात आता एक नवीन शिमगा पद्धत काही राजकीय पक्षांनी सुरु केली आहे,” असा हल्लाबोल त्यांनी चढवला.

“काही प्रश्न सोडण्यात १०० टक्के अपयश आले की ३६५ दिवस शिमगा अशा पद्धतीने नवीन कारभार सुरु झाला आहे. अनुदान, शेतकऱ्यांच्या समस्या, अतिवृष्टीग्रस्तांना मदत यावरती कोणीही बोलत नाही,” असे देखील मुनगंटीवार यांनी सांगितलं.

शरद पवार यांचे राज्यपालांना खरमरीत पत्र
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पुन्हा एक खरमरीत पत्र लिहिलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या राज्यपाल सचिवालयातर्फे प्रकाशित करण्यात आलेलं ‘जनराज्यपाल – भगतसिंह कोश्यारी’ हे चित्ररुप कॉफी टेबल पुस्तक शरद पवार यांना पाठवले होते. त्या पुस्तकावरुन शरद पवार यांनी पुन्हा एकदा राज्यपाल कोश्यारी यांना खरमरीत शब्दात एक पत्र लिहिलं आहे.

पुस्तकाच्या सुरुवातीच्या शिर्षकावरूनच पवार यांनी राज्यपालांना फटकारले आहे. “वास्तविक भारतीय संविधानात ‘जनराज्यपाल’ असा उल्लेख आढळत नाही, तरीही राज्य शासनाच्या वतीने सुबक छपाई असलेले आपल्या एक वर्षाच्या मर्यादित कालावधीवर प्रकाश टाकणारे स्व प्रसिद्ध कॉफी टेबल बुक पाठवण्यात आले याबद्दल धन्यवाद,” अशा शब्दांमध्ये पवार यांनी राज्यपालांच्या पत्राला खोचक असे प्रत्युत्तर दिले आहे.