काँग्रेसची ‘एक्सपायरी डेट’ संपली ; आता ‘हे’ नेते भाजपमध्ये येणार : सुधीर मुनगंटीवार

नागपूर : पोलिसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत भाजपकडून काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेसमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यातच विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक कॉंग्रेस आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. यावर बोलताना, राजकरणात काँग्रेसची ‘एक्सपायरी डेट’ संपली असल्याचा खोचक टोला राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला आहे. नागपूर येथील पत्रकार परिषेद मुनगंटीवार बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदीं ज्याप्रमाणे म्हणतात की, निस्वार्थीपणे राजकीय सेवा केली पाहिजे, त्यानुसार कॉंग्रेसमध्ये असलेल्या चांगल्या आणि निस्वार्थीपणे राजकीय सेवा करणाऱ्या लोकांना भाजपमध्ये घेतले जाईल. कॉंग्रेसमध्ये देखील आजही काही मोजकी लोकं आहेत, जी कोणतीही अपेक्षा न ठेवता काम करतात अशा लोकांना पक्षात संधी दिली जाईल असे मुनगंटीवार म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की, औषधाची ज्याप्रमाणे एक्सपायरी डेट संपते, त्याचप्रमाणे काँग्रेसचीही राजकरणात एक्सपायरी डेट संपली आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वीच विखेंनी भाजपचा हात धरला होता. त्याचवेळी औरंगाबादमधील सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी पक्षाच्या विरोधात जाऊन काम केले. त्यानंतर आता कॉंग्रेसचे अनेक आमदार भाजपच्या वाटेवर असल्याचे सत्तार यांनी खुलासा केला आहे. त्यामुळे कॉंग्रेसला राज्यात उतरती कळा लागल्याची चर्चा आहे.