पुण्यातील नवले यांच्या कारखान्यातील जप्त साखरेचा लिलाव

अहमदनगर: पोलीसनामा ऑनलाईन – जामखेड तालुक्यातील हळगाव येथील जय श्रीराम शुगर अँग्रो प्रॉडक्ट या साखर कारखान्यांने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे ‘एफआरपी’चे 16 कोटी 78 लाख रुपये थकविल्याने त्यांची साखर जप्त करण्यात आली आहे. सदर साखरेचा 2 मार्च रोजी लिलाव करण्यात येणार आहे. पुण्यातील नवले कुटुंबीयांच्या मालकीच्या हा खासगी साखर कारखाना आहे.

जप्त केलेल्या साखळीच्या लिलावातून येणाऱ्या रकमेतून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकीत बिल अदा केले जाणार आहे, असे सहकार खात्याच्यावतीने सांगण्यात आले.

जयश्रीराम शुगर या खाजगी कारखान्याला 2018-19 सालच्या गाळपासाठी 29 नोव्हेंबर रोजी परवाना मिळाला होता. हंगामात कारखान्याने 1 लाख 34 हजार 213 मेट्रिक टन गाळप केले होते. कारखाना चालू झाल्यानंतर काही दिवसांनी कारखान्याने साखर विक्री करून नोव्हेंबरअखेर बिल शेतकऱ्यांना दिले होते. परंतु या हंगामातील ऊस उत्पादकांना एफआरपी प्रमाणे रक्कम दिली नाही. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी साखर आयुक्तांकडे तक्रारी केल्या होत्या. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी तालुक्यातील खर्डा येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची परिषद घेऊन जयश्रीराम साखर कारखान्याला 15 दिवसांत शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे रक्कम न दिल्यास तीव्र आंदोलन करून साखर आयुक्तांना कारखान्यावर जप्तीची कारवाई करावीचा इशारा दिला होता. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी कारखान्याला वेळोवेळी पत्रव्यवहार केला होता. कारखान्याकडून प्रतिसाद न मिळाल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे एफआरपी प्रमाणे देणी 15 टक्के व्याजासह असलेल्या 16 कोटी 78 लाख 64 हजार 25 रूपये रकमेसाठी जप्तीची नोटीस कारखान्याला बजावली. साखर कारखान्याची साखर, मोलॅसिस आणि बॅगस या उत्पादनांची विक्री करावी व शेतकऱ्यांना ‘एफआरपी’प्रमाणे रक्कम देण्याबाबत कार्यवाही करण्याचे  पत्र नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

80 हजार क्विंटल साखर जप्त – जिल्हाधिकाऱ्यांनी जामखेड तहसीलदारांना साखर आयुक्तांच्या निर्देशाप्रमाणे पत्र देऊन जयश्रीराम शुगर कारखान्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार तहसीलदार विशाल नाईकवडे व त्यांच्या पथकाने 15 फेब्रुवारी 2019 रोजी पहिली नोटीस जयश्रीराम साखर कारखान्याला शेतकऱ्यांच्या ऊसाची थकबाकी 16 कोटी 78 लाख 64 हजार 25 रूपये वसुलीसाठी नोटीस दिली. या नोटीसाला कारखान्याचे जनरल मॅनेजर व्ही. बी. निंबाळकर यांनी कारखान्याकडे 1 लाख 9 हजार 530 क्विंटल साखर उपलब्ध असून शेतकऱ्यांचे देणी व्याजासह देण्यासाठी 80 हजार क्विंटल साखर विक्री करण्यास सहमती दर्शवली.

…तर कारखान्याची मालमत्ता जप्त होणार – 17 फेब्रुवारी रोजी तहसीलदार विशाल नाईकवडे यांनी जयश्रीराम शुगर कारखान्याला स्थावर जंगम मालमत्ता जप्त करण्याची नोटीस बजावली. त्या जप्तीस कारखान्याने 80 हजार क्विंटल साखर उपलब्ध करून दिली. तहसीलदारांनी ती जप्त केली. तिसरी नोटीस देऊन जप्त केलेल्या 80 हजार क्विंटल साखरेचा 2 मार्च रोजी सकाळी 11 वाजता लिलाव प्रक्रिया ठेवली आहे. या लिलावातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे 16 कोटी 78 लाख 64 हजार रुपये 25 रूपये वसूल करण्यात येणार आहेत. तेवढी रक्कम जमा न झाल्यास इतर मालमत्ता जप्त करण्यात येणार आहे.