मुंबई – पुणे महामार्गावर साखरेचा ट्रक उलटून एकाचा मृत्यू

लोणावळा : पोलीसनामा ऑनलाईन –  मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर खंडाळा घाटातील अमृतांजन पुलाच्या खाली एक ट्रक पलटी होऊन अपघात झाला. हा ट्रक साखरेची पोती घेऊन जात होता. या अपघातात साखरेच्या पोत्यांखाली अडकल्यामुळे एकाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक क्र. (KA 28 D 5196) हा ट्रक पुण्याहून मुंबईच्या दिशेने साखरेची पोती घेऊन जात असताना चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि हा ट्रक अमृतांजन पुलाच्या खाली पलटी झाला. यामध्ये पोत्याच्या खाली अडकून एकाचा मृत्यू झाला आहे.

घटनेची माहिती समजताच बोरघाट महामार्गचे पोलीस कर्मचारी व अधिकारी, आयआरबीचे पथक व स्थानिक नागरिकांनी या घटनास्थळावर धाव घेत क्रेनच्या सहाय्याने ट्रक व पोती बाजूला करत मयत व्यक्तीला बाहेर काढले. ह्या अपघातानंतर थोड्याच अंतरावर असलेल्या खालापुर फुडमाॅलजवळ (किमी 36) दुसरा अपघात झाला.या अपघातात एका ट्रेलरला मागून येणाऱ्या दुसऱ्या ट्रेलरने धडक दिली. यामध्ये सुद्धा एकाचा मृत्यू झाला आहे.