ऊसतोडणी कामगारांनो आणखी 10 दिवस नाक दाबून ठेवा : प्रकाश आंबेडकर

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – भगवान गडाच्या पायथ्याशी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (prakash ambedkar) यांनी ऊसतोडणी (sugarcane workers) कामगारांचा मेळावा आयोजित केला होता. यामध्ये त्यांनी ऊसतोडणी कामगारांना कारखानदारांना गरज असल्याचे सांगितले. भगवान गड हे क्रांतीचे प्रतिक मानले जाते, ऊसतोडणी कामगारांनो गरज कारखानदारांना आहे, लक्षात घ्या, त्यामुळे आणखी 10 दिवस नाक दाबलेय ते तसेच ठेवा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

गरज कारखानदारांना, तुम्हाला नाही
ऊसतोड कामगरांची मोठी अडचण होतेय. तुम्हाला शेतात काम नाही मिळाले तर रोजगार हमी योजना आहे. एकदा का अर्ज केला की तीन दिवसांत सरकारला रोजगार द्यावाच लागतो. नाहीतर रोजगार भत्ता द्यावा लागतो. यामुळे गरज साखर कारखानदारांना आहे. तुम्हाला नाही, असे त्यांनी कामगारांना सांगितले.

आणखी काही दिवस थांबा
सातारा, सांगली भागात ऊसाच्या शेतात गुडघाभर पाणी साचलेले आहे. तेथील लोकच कंटाळले आहेत. आपल्यापैकी काही कामगारांना कारखानदारांनी जबरदस्तीने उचलून नेले आहे. त्यांचे काही व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्यांची अवस्था पाहिली असेलच. त्यांना रहायला जागा नाही. यामुळे आणखी काही दिवस थांबा, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले.

तर पोलिसांना (police) हाक मारा
मशीन सहा इंच वरुन ऊस कापते आणि जर खोडापासून कापला गेला तर साखर अधिक मिळते. यामुळे कारखान्यांनी किती जरी मशीन आणण्याचा प्रयत्न केला तर तो असफल होणार आहे. यामुळे कारखानदार तुम्हाला कधीच सोडणार नाहीत. जर तुम्हाला उचलून नेत असतील तर वाटेत दिसणाऱ्या पोलिसाला हाक मारा, हात दाखवा आणि त्यांना सांगा हे जबरदस्तीने नेत आहेत, असाही सल्ला त्यांनी दिला.