सांगलीत पूरग्रस्तांनी पाहिला ‘खराखुरा’ सिंघम !

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या आठ दिवसापासून सांगलीसह परिसरात महापुराने थैमान घातले आहे. पूरग्रस्तांना मदत देण्यात प्रशासन कमी पडत होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनीच पुढाकार घेतला. स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी पूरग्रस्तांपर्यंत मदत पोहोचवली. शिवाय नागरिकांना धीरही दिला. पुरातून बाहेर आलेल्यांनी आम्ही शर्मा यांच्या रूपाने खराखुरा सिंघम पहिल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.

मंगळवारपासून सांगली भोवती पुराचा फास आवळत चालला होता. पाणी पातळी फार वाढणार नाही या भ्रमात स्थानिक प्रशासन होते. सोमवारी शिराळा येथील नागपंचमीचा बंदोबस्त संपवून पोलीस परतले होते. कोयनेतून विसर्ग वाढतच असल्याचे समजल्यानंतर अधीक्षक शर्मा यांनी तातडीने नियोजन करण्यास सुरुवात केली. अधिकाऱ्यांना भराभर सूचना देवून ते स्वतः बाहेर पडले. सांगलीवाडी, हरिपूर, धामणी, पद्माळ आदी गावांत फिरून पाहणी केली. तेथील ग्रामस्थांना घराबाहेर पडून सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन केले.

बुधवारपासून पुराची स्थिती भयावह बनली. प्रशासनाकडून तातडीने कार्यवाही करण्यात आली नाही. पुरात अडकलेल्या लोकांचा रोष वाढू लागला. त्यानंतर अधीक्षक शर्मा यांनी हालचाली सुरू केल्या. व्हीआयपी बंदोबस्ताचे नियोजन करत त्यांनी पाण्याने वेढलेल्या गावातील लोकांना भेट देण्यास सुरुवात केली. कमरे एवढया पाण्यातून जाऊन स्वतः बचाव कार्य सुरू केले. नेते आणि प्रशासन यांच्यावर संतप्त झालेल्या नागरिकांना दिलासा दिला.

सांगलीवाडीत मंत्र्यांवर रोष व्यक्त करण्यात आला. मात्र अधीक्षक शर्मा यांनी त्यांची समजूत काढली. त्यांच्या पर्यंत मदत पोहोचवली. नंतर तेथील नागरिकांना सांगलीत सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम वेगात सुरू झाले. ते स्वतः या बचाव कार्यावर लक्ष ठेवून होते. हरिपूर, पद्माळ, कर्नाळ, धामणी, डीग्रज, ब्रह्मनाळ या गावात जाऊनही मदत कार्य केले. दिवस रात्र त्यांनी केलेले बचाव कार्य, पूरग्रस्तांना दिलेला आधार यामुळे नागरिक भारावून गेले. त्यामुळे पुरातून सुटका झाल्यावर नागरिकांनी आम्ही खराखुरा सिंघम पाहिल्याची भावना व्यक्त केली.

आरोग्यविषयक वृत्त