पूरग्रस्त बच्चेकंपनीला पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांची अनोखी भेट !

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – सांगलीत सव्वा लाख पूरग्रस्तांचे स्थलांतर करण्यात आले आहे. अनेक संस्था, संघटना, व्यक्तींकडून पूरग्रस्तांना जेवण, चादरी, चटई वाटप करण्यात येत आहे. मात्र या पूरग्रस्तांची लहान मुले चिडचिड करत होती. अनेक निवारा केंद्रांना भेट दिल्यानंतर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्या लक्षात ही बाब आली. त्यांनतर त्यांनी तातडीने सूत्रे हलवत मंगळवारी पूरग्रस्तांच्या बच्चे कंपनीला खेळण्यांचे वाटप केले. त्यांनंतर त्या निरागस चेहऱ्यांवर पसरलेले हास्य पाहून अनेकांना गहिवरून आले.

मंगळवार दि. ६ ऑगस्टपासून महापुराने सांगली शहरासह अनेक गावात फास आवळण्यास सुरुवात केली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अधीक्षक शर्मा यांनी सूत्रे हलवत पूरग्रस्त भागात तातडीने पोलिस पाठवले. ते स्वतःही कामगिरीवर निघाले. कृष्णा काठावरील अनेक गावांत ते बोटीने, पोहत, छाती एवढ्या पाण्यात चालत जाऊन नागरिकांना धीर दिला. कोणत्याही शासकीय मदतीची वाट न पाहता बचाव कार्य सुरू केले. सोमवारी बचाव कार्य पूर्ण झाले. मग त्यांनंतर त्यांनी पूरग्रस्त निवारा केंद्रांना भेटी देण्यास सुरुवात केली.

यावेळी पूरग्रस्तांना सर्व प्रकारची मदत मिळत असल्याचे दिसून आले. मात्र या पूरग्रस्तांची लहान मुले चिडचिड करत असल्याचे दिसून आले. त्यांनी यामागील कारण शोधले. त्यावेळी त्या मुलांना खेळायला मिळत नसल्यामुळे ती चिडचिड करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने सूत्रे हलवली आणि अवघ्या काही तासात या बच्चेकंपनीला खेळणी वाटण्यात आली. खेळणी वाटल्यानंतर या मुलांचे हास्य पाहून अधीक्षक शर्मा गेल्या ८ दिवसात केलेली धावपळ विसरून बच्चे कंपनीच्या सहवासात रमून गेले.
यावेळी मिरजेचे पोलिस उप अधीक्षक संदीप सिंह गिल, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे उपस्थित होते.

आरोग्यविषयक वृत्त