पोलीस चौकशी सरु असताना अधिकाऱ्याचा रेल्वे रुळाजवळ आढळला मृतदेह, आत्महत्या-दुर्घटना की घातपात !

कल्याण : पोलीसनामा ऑनलाइन – आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरु असलेल्या एका मोठ्या कंपनीतील अधिकाऱ्याचा मृतदेह टिटवाळा रुळाजवळ आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सागर सुहास देशपांडे असे मृतदेह आढळून आलेल्या अधिकाऱ्याचे नाव असून ते ठाणे येथे वास्तव्यास होते. देशपांडे हे 11 ऑक्टोबरपासून बेपत्ता होते. त्यांचा मृतदेह रेल्वे रुळाजवळ आढळून आल्याने आत्महत्या, दुर्घटना की घातपात आहे या तिहेरी अंगाने कल्याण रेल्वे पोलीस तपास करत आहेत.

टिटवाळा रेल्वे रुळानजीक एका व्यक्तिचा मृतदेह 12 ऑक्टोबर रोजी आढळून आला होता. रेल्वे पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करुन प्रकरणाचा तपास सुरु केला. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी मृतदेहाचे फोटो सगळीकडे पाठविण्यात आले होते. अखेर पोलिसांना मृतदेहाची ओळख पटली. मृत व्यक्ती सागर देशपांडे असून ठाणे येथे वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. देशपांडे हे एका मोठ्या कंपनीत अधिकारी पदावर कार्यरत होते. त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु होती. 11 ऑक्टोबर रोजी ते टिटवाळ्याला जात असल्याचे त्यांनी त्यांच्या घरी सांगितले. तेव्हापासून ते बेपत्ता होते. त्यांचे कुटुंबीय त्यांचा शोध घेत होते तसेच ते बेपत्ता झाल्याची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.

बेपत्ता झाल्यापासून देशपांडे यांचे नातेवाईक त्यांचा शोध घेत होते. कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाल्मीक शादरुल यांनी सांगितले की, 12 ऑक्टोबर रेल्वे रुळाजवळ एक मृतदेह आढळून आला. माहिती काढून शोध घेतला असता तो मृतदेह सागर देशपांडे यांचा आहे हे स्पष्ट झाले. त्यांचा मृतदेह ज्या ठिकाणी आढळून आला. त्या ठिकाणापासून दीड किलोमीटर अंतरावर त्यांची चार चाकी गाडी निर्जनस्थळी आढळून आली.