वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून पोलीस ठाण्यातच पोलीसाचा आत्महत्येचा प्रयत्न

नांदेड (मुखेड) : पोलीसनामा ऑनलाईन – वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सतत अपमानास्पद वागणूक मिळत असल्याच्या आणि त्यांच्या त्रासाला कंटाळून पोलीस कर्मचाऱ्याने पोलीस ठाण्यात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेमुळे खळबळ उडाली असून पोलीस कर्मचाऱ्याला तात्काळ नांदेड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या सततच्या अपमानास्पद वागणूकीला कंटाळून पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे.

चंद्रकांत आंबेवार असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. आंबेवार हे मुखेड पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. हा प्रकार आज सकाळी साडेअकराच्या सुमारास मुखेड पोलीस ठाण्यात घडला. उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश सरवदे हे आज मुखेड पोलीस ठाण्यात वार्षीक तपासणीसाठी आले होते. त्यावेळी त्यांनी आंबेवार यांना महिलांच्या मंगळसुत्र चोरी प्रकरणातील तपासाबाबत जाब विचारला असता संतप्त झालेल्या आंबेवार यांनी विष प्राशन कले.

चंद्रकांत आंबेवार यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश सरवदे हे मला वेळोवेळी अपमानास्पद वागणूक देत आहेत, असे सांगत त्याने आरडाओरडा केला. त्यानंतर यांनी सोबत आणलेले विष प्राशन केले. दरम्यान हा प्रकार त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या इतर पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी आंबेवार यांच्या हातातील विषाची बाटली हिसकावून घेतली. त्यांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या ठिकाणी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना नांदेड येथे हलवण्यात आले.

उपचारादरम्यान आंबेवार यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश सरवदे हे मला वेळोवेळी मानसिक त्रास देत आहेत. तसेच पदोपदी अपमानित करून माझे खच्चीकरण करण्याचं काम करत आहेत. आज सर्वांसमोर माझा अपमान केला. त्यांच्या त्रासाला कंटाळून मी विष प्राशन केले असल्याचे त्यांनी सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त