काबूल विमानतळाबाहेर आत्मघातकी बॉम्बस्फोट; ११ ठार, १४ जखमी

काबूल : वृत्तसंस्था

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये हमीद करझाई आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर झालेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटात ११ ठार आणि १४ जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये पोलिसांचा मोठ्याप्रमाणात समावेश आहे. विमानतळाच्या प्रवेशद्वाराजवळ हा बॉम्बस्फोट झाला.

टोलो न्यूजच्या हवाल्याने ‘एएनआय’ने हे वृत्त दिले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. ज्यावेळी बॉम्बस्फोट झाला त्याचवेळी अफगाणिस्तानचे उपाध्यक्षांचा वाहन ताफा तेथून जात होता. परंतु, हा वाहनताफा बॉम्बस्फोटातून थोडक्यात बचावला.

जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले असून स्फोटाची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतलेली नाही. गेल्या काही दिवसांपासून अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा आत्मघातकी बॉम्बस्फोटांच्या संख्येत वाढ झाली आहे. या स्फोटात अनेकवेळा सामान्य नागरिकांचा मोठ्याप्रमाणात बळी जात असल्याचे दिसून येत आहे.

जाहिरात