सासुच्या जाचाला कंटाळून जावयाची आत्महत्या

केज (बीड ) : पोलीसनामा ऑनलाईन – सासू आणि पत्नीच्या जाचाला कंटाळून एकाने आत्महत्या केल्याची घटना केज तालुक्यातील सारुळ येथे रविवारी घडली. आत्महत्येपूर्वी त्याने सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. याप्रकरणी सासू आणि पत्नीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजुद्दीन मैनोदिन सय्यद (वय-३४) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

सय्यद यांची सारुळ येथे शेती असून ते शेतीव्यवसाय करतात. मात्र, त्यांची सासू आणि पत्नी या दोघींनी त्यांच्याकडे शहरात जाऊन काम करण्याचा तगादा लावला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार तो केज येथे कामास आला होता. मात्र, सासुने लातुर येथे येऊन काम करावे यासाठी तगादा लावला. लातूर येथे कामास जाण्याची सय्यद यांची इच्छा नसल्याने त्यांच्यामध्ये नेहमी वाद होत होते. तसेच सासूकडून अपमानास्पद वागणूक मिळत होती. यातच मुलासोबत माहेरी जाऊन तुमच्या विरोधात दावा दाखल करण्याची धमकी पत्नीने दिली. तसेच वडील भेटण्यासाठी आले असता सासू आणि पत्नीने वाद घालत राजुद्दीनला मारहाण केली. या बाबत त्यांनी केज पोलीस तक्रार दाखल केली होती.

यानंतर रविवारी ( दि. 17) राजुद्दीन सय्यद हे सारुळ येथे आपल्या शेतात आले आणि त्यांनी झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी पोलिसांना त्यांच्या जवळ सुसाईड नोट आढळून आली. यात, ” माझी पत्नी व सासु यांनी मला आजपर्यत खुप त्रास दिला आहे. माझी सासु सतत माझ्या सोबत भांडण करुन पत्नीला माझ्यापासून दूर घेऊन जात असे व माझ्या कुंटुबीयांना ही त्रास देत असे. या पुढे माझ्या कुंटीबीयांना ती त्रास देऊ शकत नाही” अशा आशयाचा मजकूर आढळून आला.
पुढील तपास फौजदार सुरेश माळी व जमादार मुकुंद ढाकणे हे करत आहेत.