Dombivli News : 17 वर्षाच्या मुलाची 21 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

डोंबिवली : पोलीसनामा ऑनलाइन – एका 17 वर्षाच्या मुलाने इमारतीच्या 21 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुरुवारी (दि. 18) दुपारी साडेबाराच्या सुमारास डोंबिवली शहरात ही घटना घडली आहे. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

सोहम मराठे (वय 17) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद केली आहे. विष्णुनगर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक कोळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंबिवली पश्चिमेकडील कुंभारखान पाडा येथील खंडोबा मंदिराजवळ असलेल्या यश इन्क्लेव्ह इमारतीच्या 21 व्या मजल्यावरून उडी मारून सोहमने आत्महत्या केली. सोहम हा महाविद्यालयात शिकत होता. त्याच्या आत्महत्येचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.