Aurangabad News : स्पर्धा परीक्षा लांबल्याच्या नैराश्येतून अभियंत्याची आत्महत्या

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुण अभियंत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज (शुक्रवार) घडली आहे. याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात अकस्मक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आकाश दत्तराव अडकीने (वय-22 रा. अग्रेसन भवनजवळ, सिडको एन 5) असे आत्महत्या करणाऱ्या अभियंत्याचे नाव आहे.

मृत आकाशला शासकीय अधिकारी व्हायचे होते. त्यामुळे अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर त्याने स्पर्धा परीक्षची तयारी सुरु केली. तो डॉक्टर भाऊ आणि भावजय यांच्या सोबत राहत होता. बुधवारी त्याचा भाऊ आणि भावजय कामानिमित्त मुंबईला गेले होते. त्यामुळे आकाश घरी एकटाच होता. गुरुवारी रात्री उशिरा त्याचा भाऊ आणि भावजय मुंबईहून घरी परतले. तेव्हा आकाश त्याच्या खोलीत झोपलेला होता. त्यामुळे त्याला न उठवता ते त्यांच्या खोलीत जाऊन झोपले.

सकाळी सहा वाजता आकाश अभ्यासिकेत जातो. आज तो उठला नाही, त्यामुळे त्याला उठवण्यासाठी त्याचा भाऊ खोलीत गेला. त्यावेळी आकाशने छताच्या हुकाला दोरी बांधून गळफास घेतल्याचे दिसले. घटनेची माहिती सिडको पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी आकाशला बेशुद्धवस्थेत घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. कोविडमुळे वर्षभर स्पर्धा परीक्षा झाल्या नाहीत. परीक्षा लांबल्यामुळे आकाशने नैराश्येतून आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.