धक्कादायक! दहावीच्या ‘टॉपर’ विद्यार्थीनीची ‘फी’साठी पैसे नसल्याने आत्महत्या

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – दहावीमध्ये टॉपर होती. पुढेही असेच यश मिळविण्यासाठी तिला खासगी क्लास लावला होता. पण त्याच्या फीसाठी पैशाची जमवाजमव करताना पित्याची होणारी दमछाक पाहून तिने विष प्राशन करुन आत्महत्या केली. हा धक्कादायक प्रकार शनिवारी दुपारी उघडकीस आला. यामिनी प्रमोद पाटील (वय १७, रा. भादली, ता. जळगाव) असे या तरुणीचे नाव आहे.

यामिनी ही दहावीला गावात टॉपर होती. ती जळगाव शहरातील महाविद्यालयात बारावी सायन्सचे शिक्षण घेत होती. दहावी प्रमाणेच बारावीत असेच यश मिळविण्याची तिची इच्छा होती. त्यासाठी तिने महाविद्यालयीन तसेच खासगी क्लास लावण्याचा आग्रह धरला होता. तिच्या वडिलांनी महाविद्यालय व खासगी क्लासचे काही पैसे भरले होते. बाकीचे पैसे लवकरच भरु असे त्यावेळी तिच्या वडिलांनी यामिनीला विश्वास दिला होता. त्यामुळे यामिनी महाविद्यालयात व खासगी क्लासला जात होती. मन लावून अभ्यास करत होती. मात्र, पूर्ण पैसे न भरल्याने महाविद्यालयातून आणि क्लासमधून तिला उर्वरित पैसे भरण्याची वारंवार आठवण करुन दिली जात होती. एकीकडे पैसे भरण्याचा तगादा आणि दुसरीकडे पैसे जमविताना होणारी वडिलांची कसरत पाहून यामिनी हिने शनिवारी दुपारी विष प्राशन करुन आत्महत्या केली.

Visit : Policenama.com