धक्कादायक ! ‘त्यांनी’ पोटच्या मुलांना भेटू न दिल्याने वडिलांची गळफास घेऊन आत्महत्या

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – पिंपरी-चिंचवड परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. घरगुती कारणातून पती-पत्नी विभक्त झाल्यानंतर पोटच्या मुलांना भेटण्यास आणि घरातील लग्नास येण्यास मज्जाव केल्याने वडिलांनी आत्महत्या केली. या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात मेहुणा, सासू, साडू यांच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सुरेश मूत्ताना लोखंडे (३५, रा. पिंपळे गुरव, सांगवी) यांनी आत्महत्या केली आहे. तर समाधान शिंदे, सचिन शिंदे, साडू महेश लोखंडे, गणेश लोखंडे, दुर्गाबाई शिंदे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हा प्रकार शुक्रवारी सकाळी पावणे आठच्या सुमारास घडला आहे.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश आणि पत्नी छाया हे दोघे विभक्त राहत होते. छाया तीन मुलांसह चाकण येथे माहेरी राहत आहे. १५ तारखेला साडू महेश लोखंडे याचा मुलगा गणेश याच्या लग्नासाठी पाहुणे महेश याच्या घरी आले होते. त्यावेळी सुरेश हे त्यांच्या मुलांना भेटण्यासाठी चाकण येथे महेशच्या घरी गेले. त्यावेळी पत्नी छायाने मुलांना भेटू दिले नाही. त्यावेळी मेहुणे, साडू, त्याचा मुलगा आणि सासू यांनी वाद घातला. आमच्या घरात लग्न कार्य असून तुझ्यामुळे त्यात अडथळा नको, तुला नंतर बघून घेतो, असे म्हणाले.

१७ रोजी सकाळी मेहुणे आणि साडू याने तू आमच्या लग्नात यायचे नाही, पोरांना भेटायचे नाही असे सांगितले. या मानसिक तणावातून शुक्रवारी सकाळी पावणे आठच्या सुमारास राहते घरात नायलॉन दोरीच्या सहायाने गळफास घेऊन सुरेश यांनी आत्महत्या केली. तपास सांगवी पोलीस करत आहेत.