राज ठाकरे यांच्या ‘पहिल्या’ कट्टर समर्थकाची आत्महत्या

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेमधून राज ठाकरे हे बाहेर पडल्यानंतर त्यांचे समर्थनार्थ शिवसेनेतील आपल्या सर्व पदांचा राजीनामा देणारे पहिले कट्टर समर्थक संभाजी जाधव (वय ४७) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. व्यवसायाने शेतकरी असलेल्या संभाजी जाधव यांनी शेतीवरील कर्ज वाढल्याने नैराश्यातून आपली जीवनयात्रा संपविली.

राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून मनसेच्या स्थापनेची घोषणा केल्यानंतर राज ठाकरे यांच्याबरोबर जाणारे संभाजी जाधव हे मराठवाड्यातील पहिले पदाधिकारी होते. राज ठाकरे यांचेही जाधव यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध होते. विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून जाधव यांनी काम केले आहे.

संभाजी जाधव हे नांदेडजवळील डौर गावचे रहिवासी होते. ते स्वत: नांदेड शहरातील तरोडा नाका परिसरात रहात होते. गेल्या ४ वर्षांपासून कायम दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतीचे कर्ज वाढले होते. त्यातून हतलब होऊन संभाजी जाधव यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगण्यात येते.

आरोग्यविषयक वृत्त –