लॉकडाऊनला वैतागून मजूराची आत्महत्या

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाईन – घरात वृद्ध आईवडिल, पत्नी, दोन मुले अशा परिवाराचा उदर निवार्ह कसा या विवंचनेत असतानाच पाचवा लॉकडाऊन जाहीर झाल्याने वैतागलेल्या एका मजूराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सोमवारी सकाळी उघडकीस आले़. सुनील टेकाम (वय ३५, रा़ नरसाळा, मारेगाव, जि़ यवतमाळ) असे या मजूराचे नाव आहे़ त्याने एका शेतकऱ्याच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

याबाबतची मिळालेली माहिती अशी, सुनील टेकाम हा मिळेल तेथे मजूर करीत असे. मार्च महिन्यात लॉकडाऊन झाल्यापासून तो घरीच होता. घरात खायला अन्नाचा कण नाही. सुरुवातीला सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या मदतीने इतके दिवस त्याच्या पोटात अन्नाचे काही घास पडत होते. पण, लॉकडाऊन वाढत गेला तशी मदतही मिळणे अवघड होत गेले. त्यातून उपासमारी सुरु झाली. त्यात रविवारी पुन्हा लॉकडाऊन ५ जाहीर झाला. त्यामुळे सुनिल आणखीनच अस्वस्थ झाला.

रविवारी सायंकाळी तो गिट्टी खदाणीवर काम शोधून येतो, असे सांगून घरातून बाहेर पडला. त्यानंतर तो घरी परत आलाच नाही. त्याचे नातेवाईक त्याचा रात्रभर शोध घेत होते. सोमवारी सकाळी एका शेतातील लिंबाच्या झाडाला त्याने गळफास घेतल्याचे आढळून आले. वृद्ध आईवडिल, पत्नी व २ मुलांच्या विवंचनेत त्याने स्वत: आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like