धक्कादायक ! सोलापूरमध्ये कर्जबाजारी बारचालकाची पत्नी आणि दोन मुलांसह आत्महत्या

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – सोलापूर शहरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असताना एक खळबळजनक घटना घडली आहे. कोरोनामुळे शहरातील उद्योगधंदे बंद आहेत. त्यातच डोक्यावर कर्जाचा डोंगर असल्याने सोलापुरातील एका बार चालकाने पत्नी आणि दोन मुलांसह आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे सोलापूरमध्ये खळबळ उडाली आहे.

अमोल जगताप (वय-35) असे बारचालकाचे नाव आहे. त्याची पत्नी मयुरी (वय-28), मुलगा आदित्य (वय-7) आणि आयुषी (वय साडेचार वर्षे) अशी मृत झालेल्या कुटुंबीयांची नावे आहेत. जगताप कुटुंब जुना पुणे नाका परिसरातील हांडे प्लॉटमध्ये भाड्याच्या खोलीत रहात होते. जगातप कुटुंबाने कर्जबाजारीपणाला कंटाळून आपल्या कुटुंबासमवेत आत्महत्या केली.

मिळालेल्या माहितीनुसार, अमोल जगताप हा बार चालवत होता. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागलेल्या लॉकडाऊनमुळे त्याला मोठा आर्थिक फटका बसला होता. त्यामुळे कर्जबारीपणाला वैतागून आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह आत्महत्या केली. लॉकडाऊनमुळे कर्जाचा डोंगर वाढतच गेला. हे असह्य होऊ लागल्याने त्याने पत्नी आणि दोन्ही मुलांसह आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त अंकुश शिंदे हे घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास चावडी पोलीस करत आहेत.