विधवा वहिणीसोबत लग्न करण्यासाठी त्याच्यावर होता प्रचंड दबाव, तरूणानं रेल्वेसमोर उडी मारून स्वतःला संपवलं

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  विधवा वहिनीच्या माहेरच्या मंडळीकडून लग्नासाठी दबाव टाकला जात, तसेच खोट्या बलात्काराच्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली जात असल्याने कंटाळून एका 31 वर्षीय तरूणाने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. हरयाणाच्या फतेहाबादमध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे. पोस्टमार्टमनंतर तरूणाचा मृतदेह कुटुंबियांकडे सोपविण्यात आला. या घटनेनंतर कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

याबाबत मृत तरूणाचे वडील विनोद कुमार म्हणाले की, 3 वर्षापूर्वी त्यांच्या मोठ्या मुलाचे निधन झाले होते. नंतर विधवा सूनेच्या माहेरच्या लोकांना लोकांना माझ्या लहान मुलासोबत तिचे लग्न लावून द्यायचे होते. पण मुलगा यासाठी तयार नव्हता. सूनेच्या माहेरच्यांकडून यासाठी सतत दबाव टाकला जात होता. काही दिवसांपूर्वी सूनेच्या एका नातेवाईकांने फोन करून जर हे नातं ठरलं नाही तर तो त्याच्या परिवाराविरोधात पोलिसात तक्रार देईल. इतकेच नाही तर, लहान मुलाला खोट्या रेप केसमध्येही अडकवण्याची धमकी त्यांनी दिली होती. यामुळे माझा लहान मुलगा चिंतेत होता आणि म्हणून त्याने आत्महत्या केल्याचे ते म्हणाले. रेल्वेचे पोलीस अधिकारी धर्मपाल सिंह यांनी सांगितले की, 31 वर्षीय तरूणाने दिल्लीहून श्रीगंगानगरला जाणाऱ्या इंटरसिटी एक्सप्रेस ट्रेनखाली येऊन आत्महत्या केली. मृतदेहाजवळ एक दुचाकी आणि काही कागदपत्रे मिळाली आहेत. त्यानंतर मृतकाच्या परिवाराला माहिती देण्यात आली. पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत.