सैफ अली खान आणि ओम राऊत यांच्याविरोधात खटला दाखल ! जाणून घ्या प्रकरण

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   जौनपूर जिल्ह्यात अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि डायेक्टर ओम राऊत (Om Raut) यांच्या विरोधात प्रभारी सीजेएम पंचम कोर्टात खटला दाखल करण्यात आला आहे. नगर कोतवाली भागातील जोगियापूर मोहल्ला येथील रहिवाशी दिवाणी न्यायालयातील वकिल हिमांशु श्रीवास्तवकडून त्या दोघांवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. 23 डिसेंबर 2020 रोजी यावर सुनावणी होणार आहे.

वकिल उपेंद्र विक्रम सिंह यांच्या द्वारे दाखल केलेल्या अर्जात हिमांशु श्रीवास्तव म्हणाले, सनातन धर्मावर त्यांचा खूप विश्वास आहे. ग्रंथांमध्ये श्रीराम यांना चांगल्याचं आणि रावणाला वाईटाचं प्रतिक मानलं गेलं आहे. भगवान राम यांच्यावर आदिपुरुष सिनेमा बनवला जात आहे. यात सैफ अली खान रावणाची भूमिका साकारणार आहे.

6 डिसेंबर रोजी एका मुलाखतीत बोलताना सैफ म्हणाला होता की, रावण साकारताना मजा येईल. यात रावण वाईट नाही तर मानवी आणि मनोरंजक दाखवला आहे. त्याला आम्ही दयाळू बनवू. यात सीता हरण न्याय्य असेल. रावण दयाळू होता. लक्ष्मणानं त्याच्या बहिणीचं नाक कापलं होतं. त्यामुळं सीतेचं हरण योग्य होतं.

यानंतर आता याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे की, सैफचं वक्तव्य धार्मिक भावना दुखावणारं आहे. सनातन धर्माबद्दल चुकीचा प्रचार केला जात आहे. फिर्यादींनी त्यांच्याविरोधात केस दाखल करण्याची मागणी केली आहे. आता यावर पुढील सुनावणी ही 23 डिसेंबर रोजी होणार आहे.