वंचितचे बटन दाबल्यावर कमळाला मतदान ; सुजात आंबेडकरचा गंभीर आरोप

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांचे सुपुत्र सुजात आंबेडकरने गंभीर आरोप केले आहेत. सोलापूरमध्ये इव्हीएममध्ये गोंधळ असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या समोरचे बटन दाबले तरी कमळालाच मतदान जात आहे. तर काही ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या समोरील बटन दबत नाही. मोदींना सत्तेतून जाण्याची भिती असल्याने मोदी हे कृत्य करत आहेत. असा गंभीर आरोप सुजातने केला आहे.

दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळी सुरुवात झाली आहे. सोलापूर मतदारसंघात कॉंग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर, भाजप उमेदवार सिद्धेश्वर स्वामी यांच्यात चुरशीची लढाई आहे. परंतु सोलापूरमध्ये सकाळपासूनच इव्हिएम बिघाडाच्या तक्रारी समोर येत आहेत. यावेळी सुजात आंबेडकरने गंभीर आरोप केले आहेत.

सुजात आंबेडकर म्हणाले की, सकाळपासून आमचे बुथवरील कार्यकर्ते आणि मतदार मला फोन करून सांगत आहेत की वंचित बहुजन आघाडीच्या चिन्हासमोरील बटन दाबले की कमळाला मतदान जात आहे. तर वंचित बहुजन आघाडीच्या चिन्हासमोरील बटन दबतच नाही. अशा ठिकाणी आम्ही स्वत: तक्रार करून मशीन बदलण्यास लावत आहोत. परंतु भाजपला सत्तेतून जाण्याची भिती असल्यानेच नरेंद्र मोदी हे कृत्य करत आहेत. मात्र जनता त्यांना धडा शिकवेल.

सकाळपासून प्रकाश आंबेडकर देखील मतदारसंघातील मतदान केंद्रांवर फिरून पाहणी करत आहेत. ज्या ज्या ठिकाणी इव्हीएममध्ये बिघाड वाटला त्या त्या ठिकाणी त्यांनी मशीन बदलण्याची व्यवस्था करण्यास लावली आहे. असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.