‘दंगली घडवणाऱ्यांना बुद्ध काय समजणार ?’ : सुजित आंबेडकरांचा संभाजी भिडेंवर घणाघात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – संभाजी भिडे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे बऱ्याचदा चर्चेत असतात. बऱ्याचदा भडकावू आणि तरुणांना हिंसेस प्रवृत्त करणारी भाषणे केल्याने ते चांगलेच अडचणीत आले आहेत. नुकतेच त्यांनी भगवान गौतम बुद्धांचे नाव घेऊन जगासाठी बुद्ध यांचा उपयोग नाही, असे वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर सर्व स्तरातून त्यांच्यावर चांगलीच टीका होत आहे. आता यावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर यांनी त्यांच्यावर चांगलीच तोफ डागली आहे.

काय म्हणाले सुजात आंबेडकर :
संभाजी भिडे यांनी रविवारी सांगलीत शिवप्रतिष्ठान संघटनेकडून आयोजित करण्यात आलेल्या दुर्गामाता दौडीच्यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना ‘पंतप्रधान प्रदेशात बुद्धांचा गौरव करतात ते चुकीचे असून बुद्ध काहीच उपयोगाचा नाही, तर जगाचे कल्याण करण्यासाठी संभाजी महाराजच हवेत’ असे वक्तव्य केले होते यावर आंबेडकर यांनी उत्तर दिले. लोकशाही व्यवस्थेवर विश्वास नसणाऱ्या व्यक्तीकडून दुसरी काय अपेक्षा करणार, अशी टीका करत सुजात आंबेडकर यांनी संभाजी भिडे हे दंगली घडवणारे असून त्यांना बुद्ध समजणारच नाही असे म्हटले आहे.

मोदी आणि संघावरही टीकास्त्र :
यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही कडाडून टीका केली. अमेरिका दौऱ्यावर असताना संयुक्त राष्ट्राच्या महासभेत बोलताना मोदी यांनी भारतभूमी ही युद्धाची नव्हे तर बुद्धाची भूमी आहे. जगाला आम्ही बुद्ध दिला आहे, असे म्हटले होते. याचा धागा पकडून “पंतप्रधान मोदी आणि संघाचे नेते यांना भारतात असताना स्वत:ला नथुराम गोडसेचे समर्थक म्हणवून घेताना धन्यता वाटते. मात्र, विदेशात गेल्यानंतर त्यांना बुद्धाची आठवण येते आणि शांतीचा संदेशदेखील आठवतो” असा टोमणा सुजात आंबेडकर यांनी लगावला.

Visit : Policenama.com