निकालानंतरही राजकीय संघर्ष सुरूच ; संगमनेरमध्ये सुजय विखेंचे ‘ते’ बॅनर फाडले

संगमनेर : पोलीसनामा ऑनलाईन – निवडणूक जाहीर झाल्यापासून अहमदनगरमध्ये सुरु झालेल्या नाट्यमय राजकीय घडामोडी अद्याप थांबलेल्या नाहीत. अहमदनगरमधील नवनिर्वाचित खासदार सुजय विखे यांच्या अभिनंदनाचे बॅनर फाडण्यात आले आहेत. विखेंचे कट्टर राजकीय विरोधक असलेले बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर मतदारसंघात हा प्रकार घडला आहे. संगमनेरमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुजय विखे आणि शिर्डीतील खासदार सदाशिव लोखंडे यांच्या अभिनंदनाचे बॅनर लावण्यात आले होते. त्या बॅनरवर ‘आता कोण रोखणार हे वादळ’ असे लिहले होते. अज्ञात व्यक्तींनी हे बॅनर फाडून टाकले आहेत. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुजय विखेंच्या विजयात आ. कर्डिलेंचा वाटा नाही –

डॉ. सुजय विखे यांच्या मताधिक्यात महाआघाडी आणि निष्ठावंत भाजपचा वाटा आहे. आमदार शिवाजी कर्डिले यांचा या यशात कोणताही संबंध नाही. त्यांना जनतेने नाकारले आहे, असा आरोप नगर तालुक्यातील महायुतीच्या नेत्यांनी काल पत्रकार परिषदेत केला होता. त्यानंतर आता सुजय विखे यांचे बॅनर फाडण्यात आले आहेत. त्यामुळे निवडणुकीचा निकाल लागला मात्र अहमदनगरमध्ये अद्यापही राजकीय संघर्ष सुरु आहे.

नगरमध्ये राजकीय घडामोडी –

काँग्रेसमध्ये असताना सुजय विखेंना अहमदनगर मतदारसंघातून निवडणूक लढवायची होती मात्र ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्यावर होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी सुजय विखेंसाठी नगरची जागा सोडण्यास नकार दिला. त्यामुळे सुजय विखेंनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये पक्षांतर केले. भाजपच्या तिकिटावर सुजय विखेंनी राष्ट्रवादीचे संग्राम जगताप यांचा पराभव करत निवडणूक जिंकली. सुजय यांच्या प्रवेशापासून राधाकृष्ण यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू होती. निवडणुकीच्या काळात त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला होता. आता विखेंसोबत राज्यातील १२ आमदार भाजपमध्ये जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.