रोहित पवारांच्या पराभवासाठी खा. सुजय विखेंनी कसली ‘कंबर’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – नगर जिल्ह्यात भाजपमध्ये सुजय विखे हे सध्या स्टार प्रचारक बनले आहेत. युतीच्या उमेदवारांसाठी ते ठिकठिकाणी प्रचारसभा घेत आहेत. त्यांनी आपल्या यंत्रणेलाही कामाला लावले आहे.

कर्जत-जामखेड मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार निवडणूक लढवित आहेत. त्यांच्याविरोधात भाजपतर्फे पालकमंत्री राम शिंदे येथून निवडणूक लढवित आहेत. शिंदे यांच्या मदतीसाठी सुजय विखे पाटील प्रचाराला लागले आहेत. सुजय यांनी आपली सर्व यंत्रणा राम शिंदे यांच्या मदतीला उतरवली आहे. विशेष म्हणजे या मतदारसंघात विखेंना लोकसभेच्या निवडणुकीला कमी मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे विखे यांनी कर्जत-जामखेडची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.

श्रीगोंदा मतदार संघात विखे यांनी राजेंद्र नागवडे यांना भाजपमध्ये आणले आहेत. याचा फायदा भाजपचे बबनराव पाचपुते यांना मदत होणार आहे. पारनेरमध्येही विखे विजय औटी यांच्या प्रचारासाठी सभा घेत आहे. तर शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातही मोनिका राजळे यांच्या साठीही त्यांनी ताकत पणाला लावली आहे. त्याचप्रमाणे राहुरी, श्रीरामपूर, कोपरगाव, नेवासा, संगमनेर या मतदारसंघातही त्यांनी विशेष लक्ष घातले आहे.

त्यामुळे नगर जिल्ह्यात भाजपमध्ये सुजय विखे हे सध्या किंगमेकरच्या भूमिकेत आहेत. त्यांनी बहुतांश मतदारसंघात त्यांची यंत्रणा भाजपच्या उमेदवारांच्या मदतीला उतरवली आहे. त्यांचा प्रचाराचा सर्व रोख हा राष्ट्रवादीवर आहे.

 

Visit : Policenama.com