लोकसभेच्या उमेदवारीसाठी अखेर सुजय विखे-पाटील यांचा भाजपात प्रवेश 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन  – विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांच्या उमेदवारीवरून राजकीय वर्तुळात गेले काही दिवस उलट सुलट चर्चा रंगताना दिसत आहे. असे असताना आता सुजय पाटील यांचा भाजपमधील प्रवेश निश्चित झाला आहे. सुजय विखे-पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. सुजय विखेंच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम मुंबईतील वानखडे स्टेडियम मधील एमसीए पॅव्हेलियन येथे सुजय विखेंच्या भाजपप्रवेशासाठी भाजपसह विखेंच्या कार्यकर्त्यांनी जंगी तयारी केली गेली होती.

या प्रवेश सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: उपस्थित होते. अहमदनगराच्या काही निवडक कार्यकर्त्यांना आज रात्री मुंबईत येण्याचे आदेश आधीच देण्यात आले होते. त्यामुळे विखेंकडून मुंबईत मोठे शक्तीप्रदर्शन करण्यात आले. सुजय विखे पाटील यांच्या पत्नी धनुश्री यांच्यासह कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी जलसम्पदा मंत्री गिरीश महाजन, रावसाहेब दानवे यांच्यासह भाजपचे नेते उपस्थित होते.

राधाकृष्ण विखे पाटील राजीनामा देणार ?
लोकसभेच्या निवडणुकीनिमित्त महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच ढवळून निघू लागले आहे. भाजपच्या वाटेवर असणारे डॉ. सुजय विखे-पाटील हे भाजपमध्ये जाण्याची शक्यता बळावली असताना आता राधाकृष्ण विखे-पाटील हे देखील भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे ते लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा देऊ शकतात.

सुजय विखे पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत आज १२ मार्च रोजी दादर येथील वसंत स्मृती सभागृहात भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. तर मुलाने भाजपमध्ये प्रवेश केला तर आपण आपल्या अंतरात्माचा आवाज ऐकून राजकीय निर्णय घेऊ असे सूचक विधान राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे.

राज्याचे विरोधी पक्ष नेते पद असणारे काँग्रेसचे जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांची अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारी वरून काँग्रेस आघाडीने चांगलीच हेळसांड केली आहे. आघाडीच्या जागा वाटपात काही वर्षांपूर्वी नगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देण्यात आली. त्यानंतर राष्ट्रवादी पक्षाने आज तागायत हि जागा सोडण्यास नकार दिला आहे. तर राज्याचा विरोधी पक्ष नेता असून देखील पक्ष माझी हेळसांड उघड्या डोळ्याने बघत आहे अशी खंत सुद्धा राधाकृष्ण विखे पाटील यांनी वेळोवेळी बोलून दाखवली आहे. त्यामुळे त्यांच्या समोर सध्या तरी काँग्रेस सोडण्यावाचून पर्याय उरला नाही असे त्यांचे कार्यकर्ते सुद्धा त्यांना सुनावू लागले आहेत. त्यामुळे विरोधी पक्ष नेते पद भूषवणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी पदाचा राजीनामा देऊन जर भाजपमध्ये प्रवेश केला तर महाराष्ट्रात काँग्रेसला खूप मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. तसेच या घटनेचा गंभीर परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर देखील होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तूर्तास तरी सर्व राजकारणाचे लक्ष विखे पाटलांच्या भूमिकेकडे लागले आहे.