राष्ट्रवादीची उमेदवारी सुजयने धुडकावली : अजित पवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सुजय विखेंना आम्ही राष्ट्रवादीची उमेदवारी देणार होतो पण त्यांनी ती धुडकावली असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला आहे.  अजित पवार यांच्या वक्तव्याने नगरच्या राजकारणाने वेगळेच वळण घेतले आहे.

अहमदनगरची जागा काँग्रेसला सोडण्यास राष्ट्रवादी तयार नव्हती म्हणून त्या ठिकाणी काँग्रेसकडून इच्छुक असणारे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय यांनी नाइलाजाने भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशानंतर चांगली लढत देण्यासाठी राष्ट्रवादीने उमेदवारांची शोधाशोध केली आहे. अशातच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सुजय विखेंना आम्ही राष्ट्रवादीची उमेदवारी देण्यास तयार होतो मात्र सुजय विखेंनी ती उमेदवारी धुडकावली असा गौप्यस्फोट केला आहे.

राष्ट्रवादी सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर त्या ठिकाणी जोरदार लढत देण्याच्या तयारीत आहे. प्रशांत गडाख या माजी खासदार पुत्राला राष्ट्रवादीने उमेदवारीसाठी गरळ घातली पण त्यांनी लोकसभा निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. त्याच प्रमाणे सध्या तरी राष्ट्रवादीकडून अरुण जगताप यांचे नाव चर्चेत आहे.दरम्यान आज राष्ट्रवादीने आपल्या पाच लोकसभा उमेदवारीची यादी जाहीर केली आहे मात्र त्यात नगरच्या जागेवर कोण लढणार हे जाहीर केले नाही. त्यामुळे नगरच्या जागेचा राष्ट्रवादीने अद्यापही सस्पेन्स कायम ठेवला आहे.